खा. विनायक राऊत यांना जाहीर सभेत उत्तर देऊ : आ. दीपक केसरकर

खा. विनायक राऊत यांना जाहीर सभेत उत्तर देऊ : आ. दीपक केसरकर
Published on
Updated on

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : आम्ही केलेल्या उठावाच्या लाटेवर निवडून आलेल्या खा. विनायक राऊत यांनी आमच्याच विरोधात टीका, भाषणे करू नये. त्यांच्या विरोधात मी एवढ्यात काही बोलणार नाही. परंतु माझ्यावर प्रेम करणार्‍या जनतेमध्ये ते गैरसमज पसरवत असतील तर त्याचं उत्तर जाहीर सभेमध्ये आपण देऊ, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. आम्ही केलेले बंड सामाजिक परिवर्तनसाठी आहे. ही लढाई सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ऐतिहासिक राजकीय बंडानंतर तब्बल महिनाभराने सावंतवाडीत आलेले आ. दीपक केसरकर यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, खा. राऊत यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले असते तर आपण त्या खुर्चीवर बसलोच नसतो, आम्हीच उठविलेल्या लाटेवर निवडून येऊन जर उपकारांची जाण नसेल तर आमदारकी आधी खासदारकीची निवडणूक येते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला केसरकर यांनी खा. राऊत यांना लगावला.

आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना आ. केसरकर म्हणाले, मी निर्णय घेतला तो जनहितासाठी आहे, जरी माझं माझ्या पक्षावर प्रेम असलं तरी बांधिलकी माझ्या भूमीशी आहे. ज्या जनतेने मला निवडून दिले त्या जनतेची कामे अर्धवट राहिली तर ते योग्य नाही. याच विचाराने आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय मी एकटा घेतलेला नाही तर पन्नास आमदार यांनी घेतला आहे. मी आयुष्यभर ज्यांना मदत केली तिच लोकं जर माझ्या विरोधात घोषणा देत असतील, तर मनाला वाईट वाटणार. मात्र या सगळ्यांची उत्तरे आपण जाहीर सभेत देणार असून आमची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या लोकांसमोर मांडणार आहोत. मी माझी बाजू लोकांसमोर ठेवणार आहे, जर माझी बाजू खरी असेल तर जनता माझ्यासोबत राहील अन्यथा ते त्यांचा मार्ग पकडतील.

माझ्यासोबत या असे आपण कोणाला सांगणार नाही, कारण त्यांची पदे काढली जातील. मात्र असेही काही लोक आहेत की ते पदाची अपेक्षा न करता माझ्यासोबत आहेत. टीका करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ज्यावेळी तुम्ही सोबत नव्हता त्यावेळी सुद्धा जनता मला निवडून देत होती. त्यामुळे गेली अनेक वर्ष कार्यकर्ते म्हणून माझ्यासोबत काम केलेल्यांनी माझ्या विरोधात घोषणा देण्यापेक्षा जनतेची सेवा आणि काम करावे. केसरकर म्हणाले, व्यक्ती म्हणून खा. विनायक राऊत यांच्यावर आपण टीका करणार नाही. त्यांना वाटत असेल की सावंतवाडीमध्ये आपला नातेवाईक आमदार व्हावा तर त्यांनी ते जरूर प्रयत्न करावेत, किंबहुना त्याची सुरुवात ही त्यांनी केली आहे. ते आमचे नेते आहेत. सत्तेच्या काळात मुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये ते वावरत होते. त्यामुळे त्यांना दुःख झालं असेल की आपल्याला 'वर्षा'वर आता जागा राहिली नाही. जेवढा काळ त्यांनी सत्ता उपभोगली तेवढी उद्धव ठाकरे यांनीही उपभोगली नाही, आमच्या मतदारसंघातील कामे आम्ही त्यांच्याकडे मांडत होतो परंतु त्यांनी ती कधीच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली नाहीत. याच वृत्तीला आमदार कंटाळले होते, म्हणूनच हा नवा राजकीय डावपेच महाराष्ट्रात घडल्याचा दावा त्यांनी केला.

राज्य मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती माणसांना कॅबिनेटमंत्री करावे यावर मर्यादा आहे. यामुळेच काहीसा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे, शिंदे सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जोडी लवकरच महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल आणि एक शिवसैनिक म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार नक्कीच पुढे घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना. राणे कामाची पद्धत बदलतील तेव्हा आमचा वाद संपेल

ना. नारायण राणे यांच्याशी माझा कधीच वैयक्तिक वाद नव्हता, त्यामुळे ते जेव्हा आपली कामाची पद्धत बदलतील आणि मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्याचे थांबतील, तेव्हा त्यांचा आणि माझा वाद संपलेला असेल, अशी स्पटोेक्ती आ.केसरकर यांनी दिली.

तर सुरेश प्रभू आज शिवसेनेत कायम असते

आम्ही कोणीही मंत्रीपदाची मागणी केलेली नाही. कुठल्या अपेक्षेने स्वतःच्या पक्षाविरोधात उठाव केलेला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याला देखील एक इतिहास आहे. त्यांच्यावर अन्याय झाला नसता तर प्रभू हे शिवसेनेत असले असते, असा गौप्यस्फ़ोट केसरकर यांनी केला. भाजप आणि शिवसेनेच्या युतीने भारतावर राज्य केले पाहिजे हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होत. ते स्वप्न पूर करण्ययासाठी जर आम्ही भाजपच समर्थन केल तर त्यात चुकीचं काय? असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news