कोकणात सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

कोकणात सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
Published on
Updated on

रत्नागिरी /मालवण; पुढारी वृत्तसेवा  : गुड फ्रायडे…ते रविवार अशा चार दिवस सलग सुट्टया आल्याने या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरी , सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. गणपतीपुळे,मांडवी,भाट्ये ,आरे- वारे ,मालवण-दांडी किनारी पर्यटकांच्या गर्दीचे जथ्थे पहावयास मिळत आहेत. पर्यटक किनार्‍यावर स्कुबा डायव्हिंग, स्नॉकर्लिंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकाराचा बिनदिक्कत आनंद लुटत असताना शासकीय यंत्रणा मात्र सुशेगात आहे. याठिकाणी सागरीसुरक्षा रक्षक नाही किंवा पोलिस बंदोबस्त नसल्याने पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.

गेली चार दिवस गुड फ्रायडे, शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने मालवणात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील पर्यटक मालवणात दाखल झाले आहेत. पर्यटक ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी प्रथम पसंती देत असून किल्ला दर्शनासाठी मालवण बंदर जेटीवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. तर दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग, त्सुनामी आयलंड आदी ठिकाणी स्कुबा डायविंग व विविध वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी दिसून आली. समुद्र किनारी डुंबण्याचा आनंदही पर्यटक घेत आहेत. मालवणमधील किल्ल्यासह रॉक गार्डन, चिवला बीच, जय गणेश मंदिर या पर्यटन स्थळांना पर्यटक भेट देत आहेत. तारकर्ली एमटीडीसी केंद्र, तारकर्ली समुद्र किनारा, देवबाग संगम पॉईंट आदी ठिकाणीही पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. पर्यटनाचा आनंद घेतानाच पर्यटक मालवणी जेवणावर देखील ताव मारत आहेत. जेवणासाठी विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत. मच्छी जेवणाला पसंती देत आहेत. मालवण बाजारपेठ व बंदर जेटीसह इतरत्र असलेले विविध वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थची दुकानेही पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.

पर्यटकांची सुरक्षा रामभरोसेच

मालवणात गेली अनेक वर्षे राज्यभरातील पर्यटक हजेरी लावतात. काहीवेळा समुद्रात आनंद लुटत असतात तर काही पर्यटक साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद घेत असतात.अनेकवेळा पर्यटक समुद्रात बुडल्याच्या घटना घडल्या की शासकीय यंत्रणा खडबडून जागी होते.राजकीय पुढारी देखील या घटनांच्यावेळी आपली पोळी भाजून घेतात. पण पर्यटकांच्या सुरक्षेविषयी कोणतीही ठोस उपाययोजना करताना आढळून येत नाही ही शोकांतिका आजही किनार्‍यावर फेरफटका मारताना दिसून येते. याबाबत पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दिसतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news