कुडाळ : गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार ताब्यात

कुडाळ : गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार ताब्यात

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : गांजा विक्री प्रकरणात पोलिसांच्या रडावर असलेला मुख्य सूत्रधार संकेत ऊर्फ सनी मिलिंद महेंद्रकर (वय 23, रा. कणकवली-कलमठ) याला पणदूर बॉक्सवेलवर कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा पाठलाग करत शुक्रवारी रात्री 9.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दिली.

याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या बॉबी ऊर्फ फैजल बेग याने आपण महेंद्रकर याच्याकडून गांजा आणतो, अशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार कुडाळ पोलिस त्याला शोधत होते. शुक्रवारी रात्री त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. कणकवली येथून तो एका खासगी वाहनाने कुडाळच्या दिशेने जात असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली होती.

उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्यासह पोलिस नाईक स्वप्निल तांबे, विजय फोंडेकर, योगिता पेडणेकर यांनी त्याचा कणकवलीतून पाठलाग केला. पणदूर बॉक्सवेलवर आल्यावर तो जात असलेल्या रिक्षासमोर पोलिसांनी आपले वाहन आडवे नेत त्याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी सुरुवातीला चौघांना ताब्यात घेतले होते. यातील मुख्य सूत्रधार बॉबी उर्फ फैैजल बेग याच्याकडे पोलिसांना तीन किलो गांजा आढळून आला होता. त्याने सावंतवाडीतील आपल्या घरात ठेवला होता. त्यामुळे या रॅकेटमध्ये अनेकजण असल्याचा संशय असल्याने पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यात संकेत ऊर्फ सनी यांचे नाव पोलिसांना समजले होते.

कुडाळ पोलिस त्याचा गेले चार दिवस कसून तपास घेत होते, पण तो गांजाप्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार झाला होता. शुक्रवारी रात्री संकेत महेंद्रकर हा कणकवलीहून कुडाळच्या दिशेने येणार असल्याची पक्‍की खबर मिळताच कुडाळ पोलिसांनी पणदूर पुलानजीक गाडी आडवी घालत त्याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

या सर्व गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सनी हा असून जिल्ह्यातील अनेकांना त्याच्याकडून गांजा पुरवठा होतो, असे पोलिसांना समजले आहे. मात्र तो गांजा कोठून आणतो, यात आणखी कोण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सनी महेंद्रकरची पोलिस कसून चौकशी करणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सागर शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news