गोवा मद्यावर न केलेली कारवाई भरारी पथकाच्या पथ्यावर !

गोवा मद्यावर न केलेली कारवाई भरारी पथकाच्या पथ्यावर !

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) भरारी पथकाने गेल्या तीन वर्षात गोवा बनावटीचे मद्य पकडण्याची मोठी कारवाई केली नाही. भरारी पथकाची ही कार्यपद्धती या पथकातील तपास अधिकार्‍यांच्या पथ्यावर पडली आहे. समाधानकारक अशी कारवाईच नसल्याने मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचा त्रास वाचला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या प्रकरणी उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आयुक्तांनी अशा कारवाईवर सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने पनवेलमध्ये गोवा बनावटीचे मद्य पकडण्याची कारवाई केली होती. या प्रकरणी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता. कोणत्याही वाहनातून गोवा बनावटीचे मद्य हस्तगत केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित तपास अधिकार्यांकडून त्या चालकाला अटक केले जाते. ते मद्य कोणाचे आहे, त्या मालकाला पकडले जात नाही, असा मुद्दा गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. मात्र पनवेलातील कारवाईत चालकापासून ते मद्य मालकापर्यंत सर्वांना अटक करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शुंभूराज देसाई यांनी उत्तरात सांगितले. अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा उपस्थित होवून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांच्या क्षमतेवर संशय व्यक्त होवू नये म्हणून आयुक्तांनी मुळापर्यंत जावून कारवाई करण्याच्या लेखी सुचना केल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कची शहर, ग्रामीण, चिपळूण, खेड, लांजा अशा युनिटसह जिल्हाभरारी पथक कार्यरत आहे. प्रत्येक युनिटने गोवा बनावटीच्या मद्यासंदर्भात कारवाई केली आहे. युनिटमधील तपास अधिकार्यांना आयुक्तांच्या सुचनेनुसार अपुरा राहिलेला तपास करावा लागणार आहे. राज्याबाहेर जावून तपास करणे हे धोक्याचे तितकेच जिकीरीचे असते. जिल्हा भरारी पथको गेल्या तीन वर्षात गोवा बनावटीचे मद्य मोठ्या प्रमाणात पकडल्याची कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुढील गुंतागुंतीचा तपास करण्याची गरजच राहिलेली नाही. त्यामुळे अशी न झालेली कारवाई भरारी पथकाच्या एकप्रकारच्या पथ्यावर पडलेली आहे.''

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news