

देवगड : तारामुंबरी खाडीमध्ये पाण्यात तोल जावून पडल्याने पाण्यात बुडणाऱ्या महिलेला तारामुंबरी येथील चिन्मय खवळे या युवकाने पाण्यात उडी मारून वाचविले. ही घटना मंगळवारी दुपारी 2 वा. सुमारास घडली.
जामसंडे -भटवाडी येथील संगीता गोविंद आचरेकर (45) असे या महिलेचे नाव असून ती मंगळवारी दुपारी तारामुंबरी खाडीच्या बंधाऱ्यावरून चालत घरी भटवाडीकडे जात होती. त्यावेळी अचानक तिचा तोल जावून ती बंधाऱ्यावरून थेट खाडीत पडली. ही घटना पहाणाऱ्या तारामुंबरी येथील पूर्वा तारी यांनी केलेली आरडाओरड मुंबईत पोलिस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत वीरेंद्र खवळे यांनी ऐकली व त्यांनी तत्काळ सूर्यकांत खवळे यांना फोन करून माहिती दिली.
सूर्यकांत खवळे यांनी तत्काळ चिन्यम व अक्षय खवळे यांना बंधाऱ्याचा दिशेने पाठवले. चिन्मय खवळे यांनी पाण्यात उडी मारून पोहत तिच्यापर्यंत जावून तिला वाचविले.चिन्मय हा गोवा येथे स्कूबा ड्रायव्हिंग ट्रेनर म्हणून काम करीत आहे. एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल सर्वत्र त्यांच कौतुक होत आहे. चिन्यम खवळे हे खवळे महागणपती ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.