

दोडामार्ग : झोळंबे पंचक्रोशीतील शेतकर्यांवर संकटांची मालिका थांबताना दिसत नाही. एका बाजूला जंगली हत्तींच्या वारंवार होणार्या उपद्रवामुळे फळ बागायतींचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत असतानाच दुसर्या बाजूने माकडांच्या टोळ्यांनीही या बागायतीत उच्छाद मांडला आहे. नारळ, सुपारी यासारख्या पिकांचे रोजचे नुकसान करत आहेत. येथील शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात सापडला असून, पुरता मेटाकुटीला आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून झोळंबे पंचक्रोशीतील शेतकर्यांचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले आहे. नारळ, सुपारी, केळी या फळबागायती अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. यात शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले. हत्ती तेथून निघून गेल्यानंतर शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, त्यांचा हा आनंद काही दिवसांपुरताच मर्यादित राहिला. कारण परिसरात माकडांच्या टोळ्यांनी प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत असून, झाडांवरील नारळ फोडणे, सुपारी तोडणे हे रोजचेच झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या माकडांपासून शेतीचे संरक्षण करावे तरी कसे? असा यक्षप्रश्नच त्यांच्यासमोर ठाण मांडून आहे.
स्थानिक शेतकर्यांनी अनेक वेळा वनविभागाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. काही वेळा माकडे पकडली जातात, पण तो त्रास थांबताना दिसत नाही. हत्तींचा उपद्रवसुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी, त्यांच्या स्वतःच्या पिकांचे रक्षण करताना थकून गेले आहेत. या माकडांचा तत्काळ बंदोबस्त करावा. हत्तींच्या उपद्रवावरही कायमस्वरूपी तोडगा काढावा. नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. शेती क्षेत्रात वनविभागाचे नियमित गस्त पथक असावे व वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशा विविध मागण्या शेतकरी वर्गातून होत आहेत.