

दोडामार्ग : केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबवत 75 टक्के अनुदानावर पाणी गरम करण्यासाठीचे बंब ग्रामस्थांना वितरित केले. रविवारी झालेल्या कार्यक्रमात एकूण 140 लाभार्थ्यांपैकी 122 जणांना हे बंब देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामस्थांची तब्बल 8 लाखांची बचत झाली आहे.
या उपक्रमामुळे विशेषतः महिलांना जळावू लाकूड शोधण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामस्थांच्या आरोग्याची आणि वेळेची बचत होणार आहे. डब्ल्यू. सी. टी.च्या सहकार्याने आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगातून गावात पाणी गरम करण्यासाठी बंब वाटप करण्यात आले. सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, सदस्या मेघना देसाई, लक्ष्मी धुरी, गायत्री देसाई, निलेश देसाई, तसेच डब्ल्यू. सी. टी. चे अभ्यासक गिरीश पंजाबी, अमित सुतार, राहुल ठाकूर आणि सूरज शेंडे उपस्थित होते. शिवाय विविध वाड्यांतील ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला, युवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने या उपक्रमासाठी सहकार्य करणार्या डब्ल्यू. सी. टी; सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक आणि संबंधित अधिकार्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या उपक्रमास ब्रिटिश एशियन इंडियन फाऊंडेशन (बीएआयएफ) व कृष्णाग्नी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे, अशी माहिती अभ्यासक गिरीश पंजाबी यांनी दिली.
महिलांना दिलासा; पर्यावरण संरक्षणास हातभार
लाकूडफाटा गोळा करण्याचा त्रास वाचणार
ग्रामस्थांच्या आरोग्याची आणि वेळेचीही बचत
या उपक्रमामुळे प्रत्येक बंबमागे सरासरी 5,850 रुपयांची बचत ग्रामस्थांना झाली आहे. एकूण 140 बंबामुळे जवळपास 8 लाख रुपयांची आर्थिक बचत झाली. हा प्रकल्प मूळतः चंद्रपूर जिल्ह्यात डब्ल्यू. सी. टी.च्या रेझिलिएंट फ्युचर्स टीममार्फत सुरू झाला. या पुरस्कारप्राप्त उपक्रमाचा आता सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमधील केर-भेकुर्ली ही या उपक्रमाची प्रथम प्रायोगिक ग्रामपंचायत ठरली आहे.