

Weapons worship during Dussehra
आडेली: अश्विन शुद्ध नवमी या दिवशी परंपरेनुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची अवजारे स्वच्छ धुवून पुसून त्यांची विधिवत पूजा करून शस्त्रपूजन आज (दि.१) करण्यात आले.
पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे देवीने महिषासुर नावाच्या असुराशी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे सलग नऊ दिवस, नऊ रात्र युद्ध करून त्याचा वध केला. तेव्हापासून देवीला महिषासुरमर्दिनी या नावाने ओळखले जाऊ लागले. या युद्धाच्या शेवटच्या म्हणजे नवव्या दिवशी वध केल्यानंतरच देवीने तिचं शस्त्र खाली ठेवले. त्यामुळे नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला शस्त्र पूजनाची प्रथा आहे.
नवमीपासून दसऱ्याला प्रारंभ होतो तर काही गावांमध्ये विजयादशमी दसऱ्यापासून पुढे गावच्या परंपरेप्रमाणे दसरा साजरा होत असतो. दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे, शस्त्रास्त्रे, व आपल्याला उपयोगी पडणाऱ्या विविध अवजारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती बागायतींसाठी राबणाऱ्या अवजारांना नवमी दिवशी अथवा आपल्या गावच्या परंपरेप्रमाणे दसऱ्या दिवशी स्वच्छ धुऊन, घासून, पुसून स्वच्छ केली जातात.
देवखोलीत, माजघरात अथवा तुलसी वृंदावनाकडे शेतीसाठी नेहमी उपयोगात येणारी अवजारे म्हणजेच खोरे, पिकाव, कुदळ,कोयता, विळा, कुऱ्हाड,नांगर, नारळ काढणी यंत्र, नारळ सोलण्याचे यंत्र, पकड, हातोडी, स्वयंपाकात उपयोगी पडणारी चाकू, सुरी, विळी अशा विविध अवजारांची तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी उपयोगी पडणारी विविध यंत्रे तसेच पोलीस स्थानकामध्ये असणाऱ्या बंदुका, विविध कारखान्यांमध्ये असणारी यंत्रसामुग्री, दुचाकी, चारचाकी वाहन दुरुस्ती करणारे कारागीर, सलून व्यावसायिक यासहित आपल्या व्यवसायासाठी उपयोगी पडणारी विविध शस्त्रे याची नवमी दिवशी परंपरेप्रमाणे विधीवत पूजा केली जाते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यासहित इतर व्यावसायिकांनी, कारखानदारांनी नवमी अर्थात शस्त्रपूजा विधी विधिवत पूजा करून साजरी करण्यात आली.