

कोल्हापूर : कोल्हापूरात ऐतिहासिक दसरा सोहळा गुरुवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात आणि विविधतेने साजरा करण्यात येणार आहे. याची जय्यत तयारी जिल्हा व मनपा प्रशासन आणि दसरा महोत्सव समितीतर्फे करण्यात आली आहे. बुधवारी, दि. 1 ऑक्टोबरला खंडेनवमीनिमित्त शस्त्रास्त्र पूजनाचा पारंपरिक सोहळा होणार आहे. याची तयारी घरोघरी झाली आहे. बाजारात ऊस, लव्हाळा, झेंडूची फुले, शमीची पाने यासह आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.
दसरा चौकात कोल्हापूरचा पारंपरिक दसरा सोहळा होणार आहे. गुरुवारी सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याची जय्यत तयारी कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासह महापालिका व प्रशासनाच्या विविध विभागांच्या वतीने सुरू आहे. शमीपूजनासाठी लकडकोट, ध्वज उभारणी, सरदार, जहांगीरदार, मानकरी व मान्यवरांसाठी शामियाना मंडप उभारणीचे काम सुरू आहे. पावसामुळे मैदानावर ठिकठिकाणी चिखल झाल्याने मुरूम, वाळू, खडी आदींचा वापर केला जात आहे.