Watermelon Farming : पाट गावात कलिंगड शेतीला बहर
राजाराम परब
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू झाला असून महामार्गानजीक स्टॉल्सद्वारे याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट या गावात कलिंगड उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. येथील कलिंगड मधुर असून त्यांना गोवा, रत्नागिरी, बेळगाव तसेच स्थानिक बाजारात मोठी मागणी आहे. सध्या कलिंगड काढणी सुरू असून पाट गावातून दररोज जवळपास 50 टन कलिंगडे विक्रीसाठी जात आहेत. तरीही या कलिंगड शेतीद्वारे चांगला आर्थिक फायदा होत असला तरी याचे मोठे नुकसान वन्यप्राण्यांकडून केले जाते. याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पाट गावात मोठ्या प्रमाणात कलिंगड उत्पादन घेतले जाते. साधारणपणे गणेशोत्सव झाला की शेतकरी कलिंगड बी वाफ्यांमध्ये रुजविण्यास टाकतो. त्यानंतर त्याची मशागत सुरू होते. साधारणपणे तीन महिन्यात कलिंगड खाण्यास तयार होतात. या तीन महिन्याच्या काळात कलिंगड रोपांना वेळेत पाणी देणे, सेंद्रिय खताचा वापर करणे आणि फळांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. कलिंगड पिकासाठी स्थानिक शेतकरी मशागत उत्कृष्ट प्रकारे करतात. सप्टेंबर महिन्यात लावले कलिंगड बी प्रामुख्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काढणीस तयार होते. काढणी केलेली कलिंगड तत्काळ टेम्पोद्वारे वाहतूक करून जिल्ह्यातील बाजारपेठे, गोवा, रत्नागिरीसह कोल्हापूर, बेळगावमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात. येथील स्थानिक कलिंगड उत्पादक शेतकरी ही कलिंगडे थेट पद्धतीने मोठ्या व्यापाऱ्यास विक्रीस पाठवितात.
वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती असो वा जिरायती शेतीचे मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जाते. यामध्ये गवे रेडे, माकडे यांचा उपद्रव या कलिंगड शेतीला होतो. त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते. याबाबत वन विभागास वन्यप्राण्यांच्या नुकसानी आणि बंदोबस्ताविषयी अनेकदा सूचना केल्या तरी यावर कोणताच उपाय काढण्यात आलेला नाही.

