

बांदा : बांदा परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले असून, घरफोडीबरोबरच वाहनांनाही चोरांनी लक्ष्य केले आहे. शुक्रवारी रात्री वाफोली धरण परिसरात उभ्या डंपरमधील तीन बॅटर्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत लंपास केल्या.
बांदा-दाणोली मार्गावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. मात्र, या मार्गालगत असलेल्या घरे व वाहनांवर चोरांचा डोळा असल्याचे यापूर्वीच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. नुकतेच विलवडे येथे दोन वेळा घरफोडी झाली होती. या चोरांना पोलिसांचा धाक नसल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
या मार्गावरील अनेक गावांमध्ये वारंवार चोर्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवून चोर्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या चोरीची पोलिसांत नोंद करण्यात आली नाही.