

बांदा : बांदा शहरात स्थलांतरित मजुरांमध्ये पैशांच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन मारहाणीपर्यंत मजल गेली. शहरातील कट्टा कॉर्नर चौकात लादी काम करणार्या एका सेंट्रिंग कामगाराला त्याच्या दोन सहकार्यांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील 12 हजार रुपये लांबविल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या घटनेला तीन दिवस उलटूनही स्थानिक पोलिस तक्रार घेत नसल्याचा आरोप तक्रारदार दिनेश कुमार यांनी केला आहे.
दिनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 30 जुलै रोजी बांदा उड्डाणपुलाखाली घडली. आपले सहकारी राकेश यादव आणि गोपाळ स्वामी हे दोघे लादी कामगार असून ते त्यांच्यासोबतच काम करत होते. या दोघांनी काही कारणावरून कट्टा कॉर्नर चौकात आपल्याला मारहाण करून खिशातील 12 हजार रुपये काढून घेतले, तसेच त्यांनी आपला मोबाईल हिसकावून त्यातून गुगल पे वापरून 3 हजार 200 रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. एवढ्यावरच न थांबता आपल्या कुटुंबियांना फोन करून खोटे अपघाताचे कारण सांगून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही दिनेश कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी ते गेले तीन दिवस आपण बांदा पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. मात्र पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित सर्व कामगार परप्रांतीय असून गेले तीन महिने बांदा शहरात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदणी केली नसल्याने ओळख पटवणे आणि घटनेमागचे खरे कारण तपासणे आवश्यक आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वाद हा थकीत पगाराच्या पैशांवरून निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळेच तक्रारदाराला त्याच्या मुकादमला सोबत घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे. योग्य तपास करूनच कायदेशीर कारवाई केली जाईल.
गजेंद्र पालवे, सहा.पोलिस निरीक्षक-बांदा