

आचरा: आचरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी मनमानी करतात. रुग्णांशी उद्धट वागणे, चुकीचे उपचार सांगणे, तसेच महिला आरोग्य कर्मचारी यांना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी आचरा ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. याची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात येऊन आरोग्य अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली केली. (Sindhudurg News)
यावेळी उपस्थित रुग्ण, ग्रामस्थ तसेच आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कर्मचारी यांनी डॉक्टर मेस्त्री यांच्या करनाम्याचा पाढाच वाचला. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चौकशीसाठी आलेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांना ग्रामस्थांनी चार तास घेराव घालत कारवाईची मागणी लावून धरली होती. अखेर डॉ. मेस्त्री यांची आचरा येथून तत्काळ बदली करण्याचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढल्यानंतर आणि त्यांच्यावर कारवाईसाठी तयार केलेल्या अहवालची प्रत ग्रामस्थांना प्राप्त होताच ग्रामस्थांनी घेराव मागे घेतला. तसेच येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
आचरा येथे चौकशीसाठी दाखल झालेल्या जिल्हा परिषदचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर धनगे, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.जुवेरिया मुजावर उपस्थित होत्या. तर ग्रामस्थांमधून शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, मुजफ्फर मुजावर, माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, जयप्रकाश परूळेकर, राजन पांगे, अभिजित सावंत, बाबू कदम, उदय घाडी, मंगेश मेस्त्री, कपिल गुरव, सिद्धार्थ कोळगे, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, रवींद्र मुणगेकर, गुरु कांबळी, नितीन घाडी, राजू नार्वेकर, उमेश सावंत, सचिन सारंग, गजानन गांवकर, अजित घाडी, सौमित्र राणे, हर्षद धुरी व अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आचरा आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेने प्रसूती दरम्यान हेळसांड झाल्याने आपल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे सांगताना चिंदर गावठणवाडी येथील महिलेला अश्रू आणावर झाले. माझ्या बाळाच्या मृत्यूला आचरा येथील वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्या महिलेने केला.
डॉ. मेस्त्री पेपरवेट, कैची, मारण्यासाठी उगारतात. रात्री ड्युटीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कधीही मध्यरात्री येऊन मानसिक त्रास देतात. केंद्रातील प्रसाधनगृहाला टाळे ठोकून महिला कर्मचाऱ्याची अडवणूक करतात. अपंग असणारे आरोग्य सेवक यांना हाताला पकडून फरफटत केंद्रबाहेर घालवून देतात. महिला अधिकारी यांनाही अपशब्द वापरतात. तसेच त्यांच्या क्षमतेवरून रुग्णासमोर सातत्याने टीका करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रारी महिला अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.