

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सवाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. या उत्सव कालावधीत देवतरंग मांडावर येत गावागावात रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषातील नाच गाणी (खेळ) हे वेगळेच आकर्षण असते. (Sindhudurg Holi)
होळी, धूलिवंदन म्हणजेच कोकणात शिमगोत्सव आणि धुळवड म्हणून साजरी केली जाते. सिंधुदुर्गात गावहोळ्या, देवहोळ्या, राखणेहोळ्या उभ्या केल्या जातात. होळीच्या दिवशी आंबा, पोफळी, नारळ, सावर, हेळा अशा विविध झाडांची होळी उभारत पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होळी उत्सवात केले जातात.
होळी उत्सवापासून गुढी पाडव्यापर्यंत सिंधुदुर्गात तमाशा सुरू होतो. काही ठिकाणी याला मांडही म्हणतात. यात पारंपरिक आणि धार्मिक श्रद्धास्थान म्हणून हे मांड भरविले जातात. ज्या ठिकाणी होळ्या उभ्या केल्या जातात. त्या परिसरात पायातील चप्पलही घालण्यास बंदी असते. होळीच्या मांडावर चप्पल घातली, तर शबय मागितली जाते. तर विज्ञान युगात घरोघरी सोंगे घेऊन शबय (पैसै) मागण्याची परंपरा आजही टिकून आहे.
मांडावरील तमाशामध्ये पुरुषच स्त्री वेश परिधान करून नाच करतात. गण, गवळण आणि लावणी डफ तुणतुण्याच्या तालावर गायली जाते. यावेळी मांडावरील सोंग हा खरा शिमगोत्सवातील मोठा विरंगुळा असतो. अशा या शिमगोत्सवाला सिंधुदुर्गात सुरवात होणार असून गावागावांत आनंदाचे वातावरण आहे.