

विजयदुर्ग : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश केल्याबद्दल शनिवारी विजयदुर्गवासीयांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. विजयदुर्ग एसटी आगार येथून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत ही जल्लोष मिरवणूक किल्ले विजयदुर्गमध्ये नेण्यात आली.
किल्ल्यावर विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणांचा आनंद घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी एकवटले होते.
किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात विजयदुर्ग किल्ले, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील 11 किल्ले तसेच तामिळनाडूतील जिंजी असे एकूण 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणोत्सव समितीचे सचिव बाळा कदम, प्रदीप मिठबावकर, दिनेश जावकर, रविकांत राणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव दीपक करंजे, गडकिल्ले संवर्धन समितीचे यशपाल जैतापकर, पं. स. माजी सदस्या शुभा कदम, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, ग्रा. पं. सदस्या पूर्वा लोम्बर, सिद्धेश डोंगरे, पोलीस पाटील राकेश पाटील, माजी उपसरपंच महेश बिड्ये यांच्यासह विजयदुर्गचे पोलिस निरीक्षक संजय कातिवले व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मिठाई वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट झाल्याचा आनंद प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहर्यावर दिसत होता.