

विजयदुर्ग : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि मराठा आरमाराच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक विजयदुर्गच्या अभेद्य तटबंदीला मोठे भगदाड पडले आहे. किल्ल्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचा ‘व्यंकट बुरूज’ शनिवारी पहाटे समुद्राच्या लाटांच्या मार्यामुळे ढासळून समुद्रात विलीन झाला. या घटनेमुळे शिवप्रेमी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पुरातत्त्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शनिवारी पहाटे मासेमारीसाठी समुद्रात जाणार्या स्थानिक मच्छीमारांना हा धक्कादायक प्रकार सर्वप्रथम निदर्शनास आला. त्यांनी तातडीने ही माहिती किल्ले कर्मचार्यांना दिली. प्राथमिक पाहणीनुसार, बुरुजाचा पायाकडील सुमारे दोन मीटर उंच आणि पंधरा फूट रुंद भाग पूर्णपणे कोसळला आहे. ज्या ठिकाणी हा बुरुज आहे, तिथे वाघोटण खाडीचा प्रवाह थेट समुद्राला मिळतो. त्यामुळे येथे लाटांचा जोर प्रचंड असतो. विशेषतः पावसाळ्यात भरतीच्या वेळी या अजस्त्र लाटा थेट बुरुजाच्या पायावर आदळतात, ज्यामुळे तटबंदी आतून पोखरली जात होती.
या घटनेची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर यांना देण्यात आली आहे. मात्र, केवळ माहिती देऊन न थांबता, या ढासळलेल्या बुरुजाची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, इतिहासाचा हा अनमोल ठेवा सागरात गडप व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.