

वेंगुर्ले : वेंगुर्ले आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर एसटी व टेम्पोची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचे समोरील भागाचे नुकसान झाले. तर एसटीतील 10 प्रवाशी जखमी झाले असून त्यांतील दोघे गंभीर जखमी आहेत.
वेंगुर्ले आगारातून स. 8 वा. सुटलेली वेंगुर्ले -पुणे एसटी बस व वेंगुर्लेत येणारा आयशर टेम्पो यांच्यात स. 8.15 वा.च्या सुमारास ही धडक झाली. या अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर दोन प्रवाशांना दुखापती झाल्या. दुखापत झालेल्या प्रवाशांना वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले. तर गंभीर दुखापती झालेल्या दोन प्रवाशांना जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड व वेंगुर्ले पोलिस घटनास्थळी पोहोचले.
या अपघातात एकूण 10 प्रवासी जखमी झाले. त्यांना वेंगुर्ले एस. टी. आगाराकडून एकूण 7 हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.