
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 5 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरभी कलंगुटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण 3 जुलै रोजी रत्नागिरी येथे गेले होते. 4 जुलै रोजी घरी आल्यावर घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीमध्ये दिसून आला. घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट फोडून चोरट्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी कपाटामधील 1 लाख 54 हजार रुपये किंमतीच्या 4 सोन्याच्या बांगड्या, 70 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या पाटल्या, 1 लाख 22 हजार 500 रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या चेन, 75 हजार रुपये किंमतीच्या 4 सोन्याचे कानातले जोड, 75 हजार रुपये किमतीचे 2 सोन्याचे गळ्यातील हार, 21 हजार रुपये किमतीचे 2 सोन्याचे कानातील पट्टे, 49 हजार रुपये किमतीचे 1 सोन्याचे काळे मणी असलेले मंगळसूत्र, 5 हजार रुपये रोख रक्कम असा मिळून 5 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.