

वेंगुर्ला : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारात आज रविवारीपासूनच नागोबाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, साधारण दीड फुट उंचीची विक्रीसाठी दाखल झालेली नागोबाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि सणांची रेलचेल दिसून येते. नागपंचमीचा पहिलाच सण मंगळवारी (दि.29 जुलै) घरोघरी साजरा होणार आहे. गेले काही दिवस गणपतीच्या मूर्ती शाळांमध्ये तसेच काही हौशी मूर्ती कलाकार नागोबाच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त होते. दरम्यान, आज रविवारी या मूर्त्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या लहान लहान नागाच्या मूर्त्या दृष्टीस पडत होत्या. आकर्षक रंगसंगतीने बनविण्यात आलेल्या मूर्ती नागरिकांनी खरेदीही केल्या. तर रविवारी वेंगुर्ल्याचा आठवडा बाजार असल्याने दैनंदिन बाजारासोबतच नागपंचमी सणाच्या साहित्याचीही नागरिकांनी खरेदी केली.