

सगुण मातोंडकर
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगर परिषदेची निवडणूक सर्वार्थाने लक्षवेधी ठरली आहे. महायुतीतील भाजप व शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले. नियोजनबद्धतेतून भाजपला विजय शक्य झाला. तर शिंदे शिवसेनेचा इतका मोठा पराभव का झाला? याबाबतच्या कारणांची उलट सुलट चर्चा सुरू आहे. मतदान संपताच पदाधिकार्यांचे राजीनामे सत्र सुरू झाल्यामुळे यामागे अंतर्गत नाराजी कारणीभूत आहे की काय याचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान तालुका कार्यकारिणी बरखास्तीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब यांना तालुका निरीक्षक म्हणून नेमले आहे. त्यामुळे या पराभवामागे कोणकोणत्या बाबी कारणीभूत आहेत याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात युती न होता स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या गेल्यात. निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील घटक पक्ष आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन निवडणुकीत सामोरे गेले. भाजपने गतवेळी भाजपची सत्ता असताना केलेल्या विकास कामावर भर दिला. प्रचारात खुद्द भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पदाधिकार्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणा राबवली त्यामुळेच वेंगुर्लेत भाजपला विजय शक्य झाला.
तर दुसरीकडे महायुतीतील शिंदे शिवसेनेतील जिल्हाप्रमुख संजू परब सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार असल्यामुळे त्यांना वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीकडे हवा तेवढा वेळ देता आला नाही. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रतिष्ठेची असलेली सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक असल्यामुळे त्यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या प्रचार यंत्रणेकडे केसरकर यांना पुरेसा लक्ष देता आला नाही. या निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद बर्यापैकी समोर आले होते. त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नसल्याचे दिसते आहे.
वेंगुर्लेत निवडणूक रणधुमाळीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली. शिवसेनेकडून आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील झालेल्या विकास कामावर भर देण्यात आला होता. मात्र आ. दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना अंतर्गत मतभेद दूर करण्यात यश आले नसल्याची चर्चा आहे.
वेंगुले नगरपरिषदेची निवडणूक मतदान झाल्यावर तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी वैयक्तिक कारण समोर करून तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर युवा पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी राजीनामा देताच जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हस्तक्षेप करत शिवसेनेची वेंगुर्ले तालुका कार्यकारणी बरखास्त केली. त्यावेळीच निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पदाधिकार्यांनी दिलेले राजीनामे शिवसेनेच्या पराभवाचे संकेत देत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसत होते.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणूक निकालात 20 नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका लीना म्हापणकर निवडून आल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेचा उमेदवार नागेश गावडे आणि भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष राजन गिरप यांच्यात लढत झाली. निवडणूक यंत्रणा पदाधिकार्यांच्या समन्वयातून नियोजनबद्ध राबवली असली असती तर कमी फरकाने पराभूत होणारा शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला असता. तर 20 नगरसेवकांमधून किमान दहा ते बारा नगरसेवकही निवडून आले असते असे मत आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, वेंगुर्ले तालुका शिवसेनेसाठी निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नियुक्ती केली आहे. वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष पातळीवरचे धोरणात्मक निर्णय पक्ष निरीक्षकांच्या पातळीवर घेऊन नव्याने पदाधिकार्यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. आमदार दीपक केसरकर यांना मानणारा शिवसैनिक या सगळ्या घडामोडींकडे कुठच्या नजरेने पाहतो हे पाहावे लागेल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्या नाराजी नाट्याचा कितपत परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.