

Vengurla hunger strike
वेंगुर्ले : वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात तसेच तात्काळ बदलीसाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी/ कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेटवर आमरण उपोषण करण्यात येत आहे. सकाळी ८.३० वाजता हे उपोषण सुरू करण्यात आले असून दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत ठोस निर्णय न झाल्याने हे आमरण उपोषण सुरूच आहे.
या उपोषणात विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर, आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, विभागीय सहसचिव स्वप्निल रजपूत, विभागीय सदस्य महादेव भगत आदी सहभागी झाले आहेत.
या उपोषणस्थळी वेंगुर्ले भाजपा माजी अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच सायंकाळी उशिरा वेंगुर्ले तहसीलदार यांनी उपोषणस्थळी भेट दिली आहे.
वेंगुर्ला आगार प्रशासन सुस्थितीने चालून चालक वाहकांवर होणारा अन्याय थांबावा, या व अन्य मागण्या संदर्भात हे उपोषण छेडण्यात येत आहे.