

वेंगुर्ले : कृषीभूषण आबासाहेब उर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वेंगुर्ला या संस्थमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस चे देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला. या शॉर्ट टर्म कोर्सेसच्या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षीत उमेदवारांना रोजगारांच्या भरपूर संधी उपलब्ध होतील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंपत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ऑनलाईन उद्घाटनपर संबोधनात व्यक्त केला. तर संस्थेतील शॉर्ट टर्म क्लास रूमचे उद्घाटन नायब तहसिलदार राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी किशोर कृष्णा गावडे हे उपस्थित होते. तसेच ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालयाचे श्री. मांजरेकर, महिला काथ्या कारखाना वेंगुर्ला च्या संचालिका प्रज्ञा परब, या संस्थेतील आयएमसी चे मंत्री महोदय नामनिर्देशित सदस्य विनायक खवणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवारांचे संस्थेचे आयएमसी सचिव तथा प्र. प्राचार्य जगदीश गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात श्री. गवस यांनी संस्थेत सुरु होणाऱ्या शॉर्ट टर्म कोर्सेस बाबतची माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व मान्यवारांना शॉर्ट टर्म कोर्स च्या प्रवेशासाठी स्थानिक इच्छूक उमेदवारांना प्रवेश घेण्यासाठी या संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन केले. वेंगुर्ले कॅम्प येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या शॉर्ट टर्म कोर्सच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील ज्येष्ठ निदेशक जे. डी. डिसिल्वा यांनी केले.
कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी होण्यासाठी संस्थेतील ज्येष्ठ निदेशक प्रसाद कोदे, सारीका साबळे, सोनाली लिखारे, नंदकुमार नरतवडेकर, देवेश सावंत, अर्जुन गवस, लक्ष्मण नाईक, बाळकृष्ण मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेतील ज्येष्ठ निदेशक संदीप धुरी यांनी आभार मानले. या संस्थेतील शॉर्ट टर्म कोर्सचे प्रवेशासाठी समन्वयक म्हणून संदीप धुरी व सारीका साबळे काम पाहातील. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची व स्थानिक नागरीकांची या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती होती.