

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात 19 ते 28 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे.
19 रोजी नमस येथील चेतना चंद्रकांत वराडकर यांच्या घराची भिंत कोसळून 40 हजार रुपयांचे नुकसान, आरवली येथील मनाली नितीन साळगावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून 45 हजार रुपयांचे, श्रीरामवाडी येथील अनय श्रीकृष्ण मेथर यांच्या घराजवळील गोठ्याची भिंत पडून 20 हजार रुपयांचे, सुखटनबाग येथील देवदत्त रमाकांत जुवलकर यांचे शौचालयावर आंब्याचे झाड पडून 70 हजार रुपयांचे, 20 रोजी परबवाडा येथील श्रीकृष्ण अंकुश तेरेखोलकर यांच्या घराची भिंत कोसळून 20 हजार रुपयांचे, 28 रोजी परबवाडा येथील दशरथ आत्माराम सरंगळे यांच्या घराची संरक्षक भिंत पडून 60हजार रुपयांचे नुकसान झाले.
तसेच वेतोरे वरचीवाडी येथील भिकाजी नागेश नाईक यांच्या अंगणातील मंडपावर आंब्यांचे झाड पडून मंडपाचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.