

सगुण मातोंडकर
वेंगुर्ले : वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-10 एमबी’ हे वाण पंधरा वर्षाच्या संशोधनानंतर विकसित केले आहे. सन 2026 या नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी या नवीन काजू वाणाची कलमे संशोधन केंद्रा मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे कोकणातील ओल्या काजूगरांच्या व्यवसायाला चालना देणारे हे संशोधन क्रांतिकारी ठरणार आहे.
कोकणात दरवर्षी पर्यटनासाठी येणारे देशी -विदेशी पर्यटक तसेच ग्राहकांची ओल्या काजूगारांना मागणी वाढत आहे. ओल्या काजूगराची चव आगळीवेगळी असल्यामुळे या काजूगारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या अनुषंगाने ओल्या काजूगरांसाठी ‘वेंगुर्ला -10 एमबी’ हे नवीन काजू वाण नव्या वर्षात वेंगुर्ला प्रादेशिक फळसंशोधन केंद्राने विकसित केले आहे. शेतकऱ्यांसाठी ओल्या काजूगराचा हंगाम या संशोधनातून मिळालेल्या नवीन काजू वाणामुळे अधिक सुलभ जाणार आहे. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने सतत 15 वर्षांच्या संशोधनानंतर ओल्या काजूचे वाण विकसित करायला यश आले आहे.
ओल्या काजुगरासाठी वाढती मागणी लक्षात घेवून तसेच ओल्या काजू बी मधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी डॉ. बाळासाहेब बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लाच्या शास्त्रज्ञानी हे विशेष वाण विकसित केले आहे. सन 2026 या नवीन वर्षात या वाणाची कलमे शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होतील, अशी माहिती संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी दिली.
काजूम हंगामात ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटल्यामध्ये भाजीसाठी, मटण व मच्छी करीमध्ये ओल्या कानूगराचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांमधील रस्स्यामध्ये ओले काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात. शेतकरी महिला हा ओल्या काजूगरांचा रानमेवा विकायला घेऊन येतात. ओल्या काजूगराला हंगामामध्ये 350 ते 400 रूपये शेकडा असा दर मिळतो. काजू फळ परिपक्व होण्यापूर्वी कच्ची काजू बी काढून त्यातील ओला गर काढला जातो. ओले काजूगर काढण्यासाठी शेतकरी मध्यम स्वरूपाच्या काजू बीया काढतात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्यांची साल जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे अवघड असते. बऱ्याचदा गर काढताना जाडसालीमुळे अखंड काजूगर न मिळता गराचा तुकडा होतो. तसेच बियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे (सीएनएसएल) हात खराब होऊन हाताला इजा होते. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हे नवीन काजूवाण विकसित करण्यात आले आहे.