

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या धामणी येथे शनिवारी सकाळी एका काजू फॅक्टरीला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत फॅक्टरीतील महागडी मशिनरी, काजू बिया आणि इतर साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले असून, व्यावसायिक चंद्रकांत गणू भांबाडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत भांबाडे यांच्या मालकीच्या या फॅक्टरीतून सकाळी धुराचे लोट बाहेर येऊ लागताच स्थानिकांच्या लक्षात हा प्रकार आला. सुरुवातीला ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. घटनेची माहिती मिळताच देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली, परंतु तोपर्यंत फॅक्टरीचे मोठे नुकसान झाले होते.
या आगीत फॅक्टरीतील काजू प्रक्रिया करणारी महागडी मशिनरी, काजू बियांचा मोठा साठा तसेच पॅकिंग साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी विलास गोलप, संदेश घाग आणि पोलीस पाटील अनंत (अप्पा) पाध्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, पोलीस आणि संबंधित यंत्रणा याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
या आगीमुळे भांबाडे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.