

मालवण : मालवण चिवला बीच येथील ख्रिस्ती धर्मियांच्या सांताक्रुज उपासना स्थानावरील चॅपेलमधील ‘फातिमा सायबीन’ देवतेची मूर्ती अज्ञाताने बाहेर काढून तिची मोडतोड करून ती किनाऱ्यालगत टाकली, यामुळे परिसरात खळबळ उडाली. याबाबतचे वृत्त समजताच गुरुवारी सकाळी ख्रिस्ती बांधवांनी त्याठिकाणी गर्दी करत या विकृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांना पाचारण केल्यावर पोलिसांनी पंचनामा करत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकाराबद्दल ख्रिस्ती बांधवांसह मालवणतील सर्वधर्मिय नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सायंकाळी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नागरिकांनी मालवण पोलिसांची भेट घेऊन, या गंभीर प्रकाराचा सखोल तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
चिवला बीच येथे किनाऱ्यालगत जुवाव बावतीस फर्नांडिस यांच्या मालकीच्या जागेत ख्रिस्ती धर्मियांचे ‘सांताक्रुज’ हे उपासना स्थान असून त्याठिकाणी क्रॉस व छोटेखानी चॅपेल मध्ये फातिमा सायबीनची मूर्ती आहे. गुरुवारी स. 6 वा. च्या सुमारास चिवला बीच येथील रहिवासी येलीजा ग्रेसीस रॉड्रिक्स या नेहमीप्रमाणे चिवला किनाऱ्यावरील बंधाऱ्यावर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना ख्रिस्ती प्रार्थनेचे कागद जमिनीवर पडल्याचे दिसून आले. हे कागद वाऱ्याने उडून आले असतील, म्हणून कागद गोळा करून ते चॅपेलमध्ये ठेवण्यासाठी त्या गेल्या असता, त्यांना चॅपेलमध्ये फातिमा सायबीनची मूर्ती दिसून आली नाही. हे पाहून त्यांना धक्का बसला. याबाबत त्यांनी आपले दीर जॉन्सन रॉड्रिक्स व फ्रान्सिस फर्नांडिस यांना बोलावले असता त्यांनी बुधवारी रात्री 12 वा. पर्यंत आपण येथे असताना मूर्ती जागेवर होती असे सांगितले. यानंतर मूर्तीचा त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता चॅपेलपासून 30 मीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत मूर्ती तोडफोड केलेल्या व कचऱ्यात फेकलेल्या स्थितीत सापडून आली. ही माहिती कळताच शहरातील ख्रिस्ती बांधव व इतर नागरिकांनी गर्दी केली.
पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक मारुती जगताप व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आमच्या सायबीनची मूर्ती बाहेर काढून व तिची तोडफोड करून अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच नागरिकांना पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले.
याबाबत चॅपेलमध्ये फातिमा सायबीनची मूर्ती नसल्याचे प्रथम पाहणाऱ्या येलीजा ग्रेसीस यांनी मालवण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 298 अन्वये पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आजूबाजूच्या पारिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल तपास केला जात आहे असे पोलिसांनी सांगितले.