

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील ढालकाठी जवळ भाजपचे प्रचार कार्यालय सुरू होत आहे. या कार्यालयासमोरील कमानीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे कणकवलीची निवडणुक ‘महायुती’च्या माध्यमातून होण्याचे संकेत मिळाले होते. परंतू मंगळवारी या कमानीवरील शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि आ.नीलेश राणे यांचे फोटो हटविण्यात आले.
याबाबत उलट-सूलट चर्चा सूरू झाल्यानंतर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत तरी महायुतीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. नव्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र कायम आहे. मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाशी आमची युती आहे. या पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा फोटो कायम ठेवला आहे. याबाबत कोणीही गैरसमज करू नये असे समीर नलावडे यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायतीमध्ये महायुती होणार का? या प्रश्नावर बोलताना समीर नलावडे यांनी महायुतीबाबत पालकमंत्री नीतेश राणे, खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले.