

वैभववाडी ः वैभववाडी शहरातील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी नगरपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना त्यांच्या आवारात भटकी कुत्री येऊ नये त्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याबाबत निविदा काढण्यात आली असून लवकरच शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी केली जाईल, अशी माहिती वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी दिली.
गेले काही महिने वैभवाडी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून शहरातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना टार्गेट करून हल्ला केला जातो. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी भटक्या कुत्र्यांकडून शहरातील अनेक नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. भटकी कुत्री शहरात इतरत्र फिरत असल्यामुळे अचानक मोटरसायकल किंवा थ्री व्हीलर समोर आल्यामुळे मोटरसायकल व रिक्षांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी निविदा काढण्यात आली असून लवकरच यासाठी ठेकेदार निश्चित करून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नसबंदी केलेल्या या कुत्र्यांना पाच-सहा दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे व्यवस्था करावी लागणार आहे. नगरपंचायतीचे वतीने अशा पद्धतीची जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी नगरपंचायतीने पिंजरे तयार केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सरकारी रुग्णालयांना, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याची सूचना नगरपंचायतीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी यांना देण्यात आली आहे.