

कोकणात भातशेतीचे क्षेत्र ४.२ लाख हेक्टरवरून ३.१–३.३ लाख हेक्टरवर घसरले
हापूस आंबा व काजू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे
फळबागायतीतून भातापेक्षा १० पट अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल
सिंधुदुर्ग काजू उत्पादनात, तर रत्नागिरी आंबा-काजूत आघाडीवर
चिपळूण : समीर जाधव
कोकणातील शेतीमध्ये गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहे. विशेषकरून कोकणी शेतकऱ्यांनी पारंपरिक भातशेतीला बाजूला सारून आता फळ बागायतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
अधिक नफ्यासाठी व्यावसायिक पद्धतीने फळ बागायती कोकणात वाढत असून शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळ बागायती होत आहेत आणि दिवसेंदिवस भातपीक क्षेत्रात घट होताना आढळून येत आहे. २००० पासून २०२५ पर्यंत यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे.
यामध्ये साधारण १ लाख हेक्टर क्षेत्राचा फरक पडला असून फळबाग लागवड भातशेतीपेक्षा १ लाख हेक्टर क्षेत्रावर अधिक झाली आहे. एकेकाळी कोकण म्हणजे भातशेतीचे कोठार असे म्हटले जायचे.
रायगड जिल्ह्याला तर महाराष्ट्राचे भाताचे कोठार म्हटले जायचे. अलिकडे कोकणातील भातशेती कमी-कमी होत असून येथील शेतकरी फळ बागायतीकडे वळला आहे. भातशेतीमध्ये मजुरी आणि खतांचा खर्च वाढल्याने नफा कमी होत आहे.
या उलट आंबा, काजूपासून मिळणारे उत्पन्न अधिक मिळत आहे. या शिवाय पावसाची अनिश्चितता याचा परिणाम भातशेतीवर मोठा झाला असून तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, फुंडकर फळझाड योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना फळझाडासाठी अनुदान मिळत आहे. यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा बदल अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
दरवर्षी भातशेतीच्या क्षेत्रामध्ये दोन ते तीन टक्क्यामधये घट होत आहे तर दुसऱ्या बाजूला फळ बागायतीमध्ये पाच ते सहा टक्के क्षेत्र वाढत आहे. भात, नाचणीपेक्षा अलिकडे येथील शेतकरी हापूस आंबा, काजू, कोकम, सुपारी, फळपिकाकडे वळत आहे. नारळ या कोकणात हापूस आंब्याचे क्षेत्र १.८० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक आहे.
काजू लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून हे क्षेत्र १.९० लाख हेक्टर क्षेत्रावर गेले आहे. त्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा 'काजू हब' बनला आहे. या शिवाय येथील शेतकरी सुपारी, नारळाच्या बागेत आता मिरपूड, दालचिनी अशी आंतरपिके देखील घेऊ लागला आहे. भाताच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून २० वर्षांपूर्वी येथे ४.२ लाख हेक्टरवर भातशेती केली जात होती, ती आता ३.१ ते ३.३ लाख हेक्टरपर्यंत कमी झाली आहे.
भातशेतीचा वाढलेला उत्पादन खर्च शेतकऱ्यांना परवडत नसून भाताची शेते दिवसेंदिवस ओस पडत चालली आहेत. शेतकऱ्यांना भाताचा हमीभाव कमी मिळत असल्याने भात शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला येथील शेतकऱ्यांनी बागायतीकडे झेप घेतली आहे.
फळ बागायतीचे क्षेत्र १.५ लाख हेक्टरवरून ४ लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. एका हेक्टरमागे भाताचे उत्पन्न वर्षाला १५ ते २० हजार रूपये इतके मिळते तर फळबाग लागवडीतून आंबा किंवा काजू बागेतून वर्षाला हेक्टरमागे दीड ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे वळला आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा फळझाड लागवडीकडे वळत आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याने काजू उत्पादनात क्रांती केली असून सर्वाधिक पडीक जमीन काजू लागवडीखाली आली आहे. रत्नागिरीमध्ये आंबा आणि काजूची लागवड होत आहे आणि भातशेती स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादीत होत चालली आहे. दुसऱ्या बाजूला रायगड व ठाणे येथे औद्योगिक नागरीकरणामुळे भातशेती अत्यल्प होत चालली आहे. फार्म हाऊसमुळे खासगी फळझाड लागवड मात्र वाढत आहे.