दोडामार्ग : तिलारी -पाताडेश्वर येथे गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण व कार जाळपोळ प्रकरणातील आणखी अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात भाजपा युवा मोर्चा दोडामार्ग तालुका अध्यक्ष, मंडल उपाध्यक्ष यांच्यासह साटेली भेडशी उपसरपंच यांच्या पतीचाही समावेश आहे. शनिवारी सायंकाळी त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन कार, एक जीप व दोन दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांनी तक्रार दाखल करून 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजपा नगराध्यक्ष व तालुका मंडल अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती. हे पाच संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र इतर संशयित फरार झाले होते. यातील पाच संशयितांना शुक्रवारी रात्री तर उर्वरित सहा संशयितांना शनिवारी सकाळी अटक केली.
भाजपा युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष पराशर सावंत (43, तिलारीवाडी), मंडल उपाध्यक्ष आनंद तळणकर (52, झरेबांबर-काजुळवाडी), साटेली भेडशी उपसरपंच यांचे पती गणपत डिंगणेकर (54), विशाल चव्हाण (34, सुरूचीवाडी, दोडामार्ग), प्रदीप गावडे (31, विजघर-केंद्रे पुनर्वसन), श्याम गोवेकर (49, साटेली भेडशी), महेश धर्णे (45, साटेली भेडशी), कलैय्या हिरेमठ (29, खैराटवाडी, साटेली भेडशी), अरविंद धर्णे (35, गावठाणवाडी, साटेली), जयदेव काळबेकर (25, दोडामार्ग), सिताराम उर्फ राज तांबे (19, साटेली भेडशी) या 11 संशयित आरोपींना अटक करून सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.