

सावंतवाडी : ब्रिटीशकालीन उपजिल्हा कारागृहाची भिंत पडण्यास जबाबदार ठेकेदार व अभियंत्यावर पंधरा दिवसांत कारवाई करावी, अन्यथा 21 ढोल आणि गाढव घेऊन सार्व. बांधकाम कार्यालयासमोर सलामी देऊन निषेध करू, असा इशारा शुक्रवारी ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला. यावेळी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणा विरोधात ढोल- ताशे वाजवून निषेध करण्यात आला.
आ. दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी सार्व. बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून हे ‘बँड बाजा’ बारात आंदोलन पुकारण्यात आले होते.
शुक्रवारी दु. 12 वा. हे आंदोलन सुरू झाले. यावेळी ढोल-ताशे घेऊन पदाधिकार्यांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र या आंदोलनाची दोन तास दखल घेण्यात आली नाही. दोन तासांनंतर कार्यालयातील अधिकार्यांनी कार्यकारी अभियंता सौ. पूजा इंगवले या दोडामार्ग येथे शासकीय दौर्यावर गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे उपस्थित पदाधिकारी चिडले. आम्ही पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला असताना कार्यकर्त्यांना भेट न देता कार्यकारी अभियंता गेल्याच कशा?, असा सवाल करत आंदोलकांनी आपली भूमिका कडक केली. जोपर्यंत कार्यकारी अभियंता येऊन स्वतः सकारात्मक आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा इशारा पदाधिकार्यांकडून देण्यात आला.
या नंतर दुपारी 2 वा. च्या सुमारास कार्यकारी अभियंता पूजा इंगवले कार्यालयात दाखल झाल्या. आज तुमचे आंदोलन होते हे मला माहीत नसल्यामुळे आपण दोडामार्ग येथे गेले होते, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावर उपस्थित शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलन जाहीर केल्यानंतरसुद्धा आपण आंदोलनाकडे पाठ फिरवली, असा आरोप करत सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी बांधकाम अधिकार्यांचा निषेध केला.
यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी यांच्यात चर्चा झाली. कारागृहाची इमारत पडण्यास जबाबदार असणार्या संबंधित ठेकेदार आणि त्या ठिकाणी सुपरव्हिजन करणार्या बांधकामच्या अधिकार्यास पंधरा दिवसांत निलंबित करा, अन्यथा आम्ही 21 ढोल घेऊन तसेच गाढव आणून तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा श्री. राऊळ यांनी दिला.
या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटून तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होऊनसुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही दखल का घेतली नाही? असा सवाल जिल्हाप्रमुख धुरी यांनी केला. गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावेत, धोकादायक झाडे झुडपे तोडावीत, अशा सूचना आंदोलकांनी केल्या.
संबंधितांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक माघार घेणार नाही, असा इशारा उपस्थित पदाधिकार्यांकडून देण्यात आला. तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका महिला संघटक भारती कासार, नम्रता झारापकर, महिला शहर संघटक श्रुतिका दळवी, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, शहर संघटक निशांत तोरसकर, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, संतोष राऊळ, विजय राऊत, सखाराम राऊत, सचिन मुळीक, पिंट्या नेमळेकर, संदीप गवस, गुरुनाथ नाईक, नामदेव नाईक, सतीश नार्वेकर, समीरा शेख, शीतल रजपूत आदी शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.