

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप येथील अपघातानंतर जनतेच्या बाजूने अधिकार्यांना जाब विचारला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला जात असेल तर झाराप येथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच घटनेची निःपक्षपाती चौकशी करून वैभव नाईक यांच्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या, अन्यथा ठाकरे शिवसेना आणि ग्रामस्थांच्या पुन्हा महामार्ग रोखतील, असा स्पष्ट इशारा कुडाळ तालुका ठाकरे शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांनी पोलिस प्रशासनाला दिला.
चार दिवसांपूर्वी झाराप तिठ्यावर झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोको आंदोलन केले. त्यावेळी माजी आ. वैभव नाईक यांनी घटनास्थळी जात जनतेच्या बाजूने आवाज उठवत संबंधित अधिकार्यांना जाब विचारला होता. मात्र, त्यांच्या विरोधात महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर ठाकरेंची शिवसेना - युवासेना आक्रमक झाली आहे. शनिवारी कुडाळ तालुका ठाकरे शिवसेना - युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील पोलिस ठाण्यात धडक देत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी चर्चा केली. घटनास्थळी असा कोणताही प्रकार झालेला असून, महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जनतेच्या बाजूने वैभव नाईक सातत्याने आवाज उठवत असल्याने त्यांचा आवाज दडपण्यासाठीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पदाधिकार्यांनी सांगत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील संपूर्ण ठाकरे शिवसेना वैभव नाईक यांच्या पाठीशी उभी आहे.
साक्षीदारांकडून चुकीच्या प्रकारे साक्ष नोंदवून न घेता या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी आणि वैभव नाईक यांच्यावरील खोटा गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोखून मोठे जनआंदोलन उभारून, हा गुन्हा मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडू असा इशारा शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख योगेश धुरी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, बाळू पालव, वर्दे सरपंच पपू पालव, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, प्रदीप गावडे, विभाग प्रमुख सचिन ठाकूर, रूपेश वाडयेकर, युवासेना उपविभाग प्रमुख रूपेश खडपकर, नेरूर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, अॅड.सुधीर राऊळ, गुरू गडकर, अमित राणे, प्रसाद गावडे, विनय गावडे, नितीन सावंत आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, झाराप तिठा येथे चुकीच्या पद्धतीने मिडलकट ठेवला आहे. या मिडलकटमुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला, हा मिडलकट बंद करून त्याठिकाणी सर्कल किंवा उड्डाण पूल उभारावे अशी मागणी झाराप पंचक्रोशी ग्रामस्थांकडून महामार्ग प्राधिकरणकडे वारंवार करण्यात आली. परंतु संबधित अधिकार्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या मिडलकटमुळे मंगळवारी पुन्हा अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता. त्यावेळी वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना ‘मिडलकट’बाबत जाब विचारला. याआधीही वैभव नाईक यांनी महामार्गावरील खड्ड्यांप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे वैभव नाईक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर मुकेश साळुंके यांनी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मुकेश साळुंके यांच्या जातीचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेले नाही. आम्ही त्याठिकाणी उपस्थित होतो.
दरम्यान, झाराप येथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा महामार्ग अडवून जनआंदोलन छेडू, असा इशारा ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी निवेदनातून पोलिस प्रशासनाला दिला.
मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर आणि वेताळबांबर्डेत खड्डे पडून रस्त्याची गंभीर दुरवस्था झाली आहे. तेथे दररोज अपघात होत आहेत. याठिकाणी प्रवास करणे धोकादायक झाले आहे. मग अशावेळी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी कुठे आहेत? त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? हायवे सुरक्षित कधी करणार? असा सवाल करत उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी वस्तुस्थितीकडे पोलिस निरीक्षकांचे लक्ष वेधले.