

दोडामार्ग : ‘सरकार जेवते तुपाशी,जनता मात्र उपाशी’! अशा घोषणांनी दोडामार्ग तालुका दुमदुमून गेला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने विविध प्रलंबित विकासकामे, शासनाची निष्क्रियता आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे ‘ढोल बजावो’ आंदोलन छेडण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील प्रशासनाच्या ढीम्म कारभाराविरोधात गुरुवारी ‘ढोल बजाओ’ आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दिला होता. या नुसार गुरुवारी सकाळी शिवसैनिक एकवटले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणा देत शिवसैनिकांनी वन विभाग, सार्व.बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि महावितरण कार्यालयावर धडक दिली. निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात संतप्त घोषणा देत परिसर दणाणून टाकला.
प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. निर्ढावलेल्या व सुस्त झालेल्या प्रशासना विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, संतोष मोर्ये, मिलिंद नाईक, संदेश वरक प्रदीप सावंत यांसह महिला आघाडी, युवासेना, शाखा व विभागप्रमुख, कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात सरकारविरोधी फलक, बॅनर्स घेऊन घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
आजचे शांततेत आंदोलन झाले, उद्या रस्त्यावर लढाई होईल! ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है! असे म्हणत सरकारने गोरगरिबांची चेष्टा थांबवावी व त्यांना दर्जेदार सेवा द्यावी, असे तालुकाप्रमुख संजय गवस यांनी स्पष्ट केले.
दोडामार्गात विकास ठप्प आहे. विभाग फक्त आश्वासने देतोय, काम मात्र काहीच नाही! हे लुटारू सरकार जनतेच्या अपेक्षांवर उतरलेले नाही. गणेश चतुर्थीपूर्वी तालुक्याला स्वतंत्र तहसीलदार हजर न झाल्यास, चतुर्थीनंतर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला.