

ठाकरेंची शिवसेना आधीच तळकोकणात बॅकफूटवर आली आहे. ठाकरे शिवसेनेला अनेक कार्यकर्ते जय महाराष्ट्र करत आहेत. अनेक पदाधिकारी, माजी आमदार ठाकरेंना सोडून गेले, तरीदेखील संघटन वाचविण्यासाठी राज्यस्तरावरील कोणताही मोठा नेता तळकोकणात आला नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ज्या संकट काळात नेत्यांनी एकत्र येवून संघर्ष करायला हवा त्या काळातच नेते आपापसात भांडत असल्यामुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडला आहे. ठाकरे शिवसेनेतील ही गटबाजी भविष्यातील निवडणुकांसाठी व पक्ष संघटनेसाठी धोक्याची घंटी राहणार हे मात्र निश्चित! अशी स्थिती असताना स्वत: माजी खासदार विनायक राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या वादात उडी घेतल्यामुळे हा वाद मिटवणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
2022 सालामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना दुभंगली, पक्ष, चिन्हसुद्धा ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे गेले. त्याही परिस्थितीत सुद्धा सिंधुदुर्गात ठाकरेंचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे संघटना वाढीसाठी धडपडत राहिले. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेत सिंधुदुर्गात ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील एका जमिनीच्या व्यवहाराचे कारण. परराज्यातील एका व्यक्तीने बनावट कागदपत्राच्या आधारे वेंगुर्ले-दापोली येथील ती जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात दाभोलीचे तलाठी, मंडळ अधिकारी, वेतोरे आणि वेंगुर्ले येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्यांनी अर्थपूर्ण व्यवहारातून परप्रांतीय व्यक्तींच्या नावे बोगस खरेदी खत नोंदवून दिल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात स्थानिक महिलांना परप्रांतीयांकडून मारहाण सुद्धा झाली. या प्रकरणात आवाज उठवण्यासाठी सोमवार 21 जुलै रोजी ठाकरे शिवसेनेच्या वतीने वेगुर्ला दुय्यम निबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. मात्र या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांनी पाठ फिरवली आणि या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबुराव धुरी व रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे शिवसेनेतील गटबाजीला फोडणी दिली.
गेल्या काही दिवसात संघटनेत होत असलेली ढवळाढवळ संघटनेच्या हिताची नाही तर संघटना नुकसान करणारी आहे. ठाकरे शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले काही नेते संघटनेची शिस्त बिघडवत आहेत, हे आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी संघटनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक व जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. संघटनेत ढवळाढवळ करणार्या नेत्यांनी जबाबदारीने वागावे, असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला. तर सद्यस्थितीत संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असताना काहीजण जाणीवपूर्वक फूट पाडून संघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रूपेश राऊळ यांनी केला.
अलीकडेच दौर्यावर आलेले माजी खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा बाहेरून आलेल्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देणे ही आमची चूक होती असे जाहीर विधान केले. दुसरीकडे माजी आमदार असल्यामुळे जनतेच्या प्रश्नावर ते कुठेही आवाज उठवू शकतात, अशी भूमिका परशुराम उपरकर यांनी घेतली.
गेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅकफूटवर आली आहे. पक्षांतर करणार्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांकडून दिसत नाही. त्यात जिल्हास्तरावरील नेते मंडळी आपल्या पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर हे विविध प्रश्नांवर एकत्र येवून आवाज उठवविताना दिसतात. बाबुराव धुरी, रूपेश राऊळ हे पदाधिकारीही पक्ष संघटनेत अॅक्टीव्ह मोडवर आहेत. आता या सर्वांची मोट एकत्र बांधून पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी घेणार कोण? हा खरा प्रश्न सध्यातरी शिवसैनिकांसमोर उभा आहे.