

कुडाळ : सामान्य माणसांमध्ये असामान्यतेचे अनेक गुण लपलेले असतात. कोकणातील विद्यार्थी हुशार व बुद्धिमान असतात. परंतु स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे. आपल्याला अधिकारी बनायचं असेल तर त्या अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन त्या अधिकर्यांचे पद व त्यांची कामे समजून घ्या आणि आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा, असा सल्ला कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी माझे कार्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी खुले आहे, असेही त्यांनी आश्वासित केले.
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तहसीलदार वीरसिंग वसावे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ध्येय करियर अकॅडमीचे प्रमुख ओंकार साळकर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार, महाविद्यालय करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. उमा सावंत, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. वसावे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय निश्चिती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी तहसीलदार पदाच्या विविध विभागांतील कार्यपद्धती आणि बदलत्या जबाबदार्या याची माहिती दिली.
स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शनासाठी माझे कार्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. विद्यार्थ्यांनी गरज वाटेल तेव्हा आपल्या कार्यालयात मोकळ्या वेळेत येऊन भेटल्यास आपण त्यांना निश्चित मार्गदर्शन करेन, अशी ग्वाही तहसीलदार श्री. वसावे यांनी विद्यार्थ्यांना दिली. श्री. साळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक पायाभूत माहिती दिली. प्रा. स्मिता परब यांनी प्रस्ताविक केले तर प्रा. हर्षदा सामंत यांनी आभार मानले.