Tarandale Dam Suicide News | तरंदळे धरणात कॉलेज युवक, युवतीने जीवन संपवले

प्रेम प्रकरणातून पाऊल उचलल्याचा संशय : कारण अस्पष्टच
Tarandale Dam suicide news
सोहम चिंदरकर ईश्वरी राणेPudhari Photo
Published on
Updated on

कणकवली : कणकवली शहरापासून सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या तरंदळे धरणात मंगळवारी रात्री सोहम कृष्णा चिंदरकर (वय 22, रा. कलमठ, कुंभारवाडी) आणि कु. ईश्वरी दीपक राणे (18, रा. कणकवली, बांधकरवाडी) या कॉलेज युवक, युवतीने आत्महत्या केली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.

सोहम चिंदरकर हा कणकवली कॉलेजमध्ये वाणिज्य शाखा तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होता, तर ईश्वरी ही कनेडी कॉलेजमध्ये बारावीत शिकत होती. सोहम आणि ईश्वरी हे एकमेकांना चांगले ओळखत होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे सोहम कॉलेजला गेला आणि दुपारी 1 वा. परत आला. कॉलेजमधून आल्यानंतर त्याने आईला आपला मोबाईल हरवल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो सायंकाळी 7 वा.च्या सुमारास मोबाईल शोधण्यासाठी आपले काका मिलिंद चिंदरकर यांची मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला,

मात्र तो रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या आईने दिर मिलिंद यांना सोहम याला कुठे पाठवले? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण त्याला कुठेही पाठवले नाही. त्याचा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी तो आपली मोटरसायकल घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आईने सोहम याने आपला मोबाईल हरवल्याने त्याने माझा मोबाईल घेतला होता आणि जाताना तो परत देऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे सोहमच्या आईच्या मोबाईलवरून त्याने कोणाशी संपर्क केला किंवा व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग केले, हे घरच्यांनी तपासले. त्यावेळी सोहमने 'sista’ या नावाने नंबर सेव्ह करुन त्या नंबरवर ईश्वरीशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग केले होते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चॅटिंग बराच वेळ चालले होते. त्यात अनेक मॅसेज एकमेकांनी केले होते. त्यात सोहमने आपला मोबाईल हरवल्याचा उल्लेख करत त्याबद्दल भीती व्यक्त केली होती. तसेच आपल्या भावना व्यक्त करत ‘आपण डॅमवर जाऊ’ असेही चॅटिंग केले होते. दरम्यान सोहम घरातून बाहेर पडल्यानंतर त्याची मैत्रिण ईश्वरी ही देखील घरात नसल्याची माहिती नंतर मिळाली. सोहमच्या या चॅटिंग मॅसेजमुळे सोहमच्या नातेवाईक आणि शेजार्‍यांनी रात्री 1 वा. च्या सुमारास तरंदळे धरण परिसर गाठला. पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.

धरणाच्या सांडव्याजवळ टॉर्चने शोध घेतला असता सोहम आणि एक मुलगी पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्यानंतर ईश्वरीच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात ती ईश्वरीच असल्याचे सांगितले. सोहमचा मृतदेह उताण्या स्थितीत आणि ईश्वरीचा मृतदेह उपडी अवस्थेत तरंगताना आढळून आला. त्यांच्या पायात चप्पल होते तर धरण स्थळावर मोटरसायकल आणि एक दोरी आढळून आली. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

या शोध मोहिमेवेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह कलमठमधील ग्रामस्थ तसेच पोलिस निरिक्षक तेजस नलवडे, सहा. पोलिस निरिक्षक गजानन पडळकर, हवालदार सुदेश तांबे, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. बुधवारी मध्यरात्री रात्री 1.20 वा.च्या मानाने ही घटना निदर्शनास आल्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

सकाळी दोघांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. याबाबतची माहिती सोहमचे काका मिलिंद चिंदरकर यांनी कणकवली पोलिसात दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सोहम याच्या पश्चात आई, काका व कुटुंबिय असा परिवार आहे तर ईश्वरी हिच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, आजी असा परिवार आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहे.

सोहम, ईश्वरीच्या आत्महत्येचे गूढच!

सोहम आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. परंतु मंगळवारी सायंकाळी त्यांच्यात व्हॉटस्अ‍ॅप चॅटिंगद्वारे काही संवाद झाला, त्यात सोहम हा आपला मोबाईल हरवल्याने अस्वस्थ झाला होता. त्याला काहीतरी भीती वाटत होती. त्यातूनच त्याने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला आणि दोघांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या मोबाईल चॅटिंगवरून प्रथमदर्शनी पुढे येत आहे. मात्र तरीही घटनास्थळी कोणतीही चिठी किंवा सोहमचा हरवलेला मोबाईल न मिळाल्याने त्यांच्या आत्महत्येचे गूढ मात्र कायमच आहे.

Tarandale Dam suicide news
Farm Fire News Sindhudurg | कळणे सडा येथील काजू बागांना आग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news