

दोडामार्ग : कळणे सडा येथील काजू बागेत आग लागून शेकडो काजू कलमे बेचिराख झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. काजू हंगामाला सुरुवात झाल्याने झाडांना मोहर येऊन बिया धरू लागल्या असतानाच घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी नामदेव देवू देसाई आणि संजय तुकाराम देसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कळणे-सडा परिसरात नामदेव देसाई व संजय देसाई यांच्या मालकीच्या काजू बागा आहेत. मंगळवारी दुपारी या बागेत अचानक आग भडकली. उन्हाचा तडाखा, कोरडे वातावरण आणि वाळलेले गवत यामुळे क्षणात या आगीचे रुपांतर वणव्यात झाले. सुमारे 4 ते 5 मीटर उंच भडकणार्या ज्वालांनी बागेतील शेकडो काजू कलमे अवघ्या काही मिनिटांत भस्मसात केली. पाण्याचा स्रोत जवळ नसल्याने ग्रामस्थांना आग विझवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्वतोपरी प्रयत्न करून अखेर आग आटोक्यात आणली. काजू पिकावर उदरनिर्वाह करणार्या देसाई कुटुंबासाठी ही मोठी आर्थिक हानी ठरली आहे. काजूचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले असून येणारा काजू हंगाम पूर्णपणे आत्ताच बेचिराख झाला आहे. शिवाय जळालेली काजू कलमांना आता पुन्हा पालवी फुटण्याची शक्यतर कमी असून ही कलमे मृत झाल्यात जमा आहेत. परिणामी येत्या पावसाळी हंगामात या बागेत नवीन काजू कलमांची लागवड करावी लागणार आहे. नवीन लागवड केलेली काजू कलमे पूर्ण उत्पादन देण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागतो. ही बाब लक्षात घेता पुढील पाच ते सहा वर्षे या बागेतून उत्पादन मिळणार नाही. उलट नवीन लागवडीसाठी व पुढील पाच वर्षे बागेच्या देखभालीसाठी लाखो रूपये खर्च करावे लागणार आहेत.
भविष्यातील उत्पादनावरही गंभीर परिणाम
काजू मोहोर आणि बी लागण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर झाडे आगीत बेचिराख झाल्याने भविष्यातील उत्पादनावरही गंभीर परिणाम झाला आहे. सरकार व प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.