

वैभववाडी : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने तळेरे- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कळे दरम्यान ठिकठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली आहे. वैभववाडी करूळघाट मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, करूळ चेक नाका येथे अनेक वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात संततधार पडणार्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्प, अंदुर व कोदे हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून, यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कुंभी धरणातून सोमवारी 1350 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आज त्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ करून ते 2600 क्युसेक इतके केले आहे. त्यामुळे धरण परिसरातील नद्यांना पूर आला असून, गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गगनबावडा ते कळे दरम्यान सांगशी, मांडुकली, असळज, खोकुर्ले, शेनवडे, किरवे, लोंघे या गावातील रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे गगनबावडा ते कळे दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराचे पाणी लवकर ओसरण्याची शक्यता कमी आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरीमार्गे चालू आहे.