

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पुरता बोजावरा उडाला आहे. त्याचा परिणाम संपर्क व ऑनलाईन सेवेवर होत आहे. वारंवार विस्कळीत होणार्या नेटवर्कमुळे ग्राहक हैराण झाले असून कंपनीच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वैभववाडी हा डोंगराळ व दळणवळणाच्या दृष्टीने दुर्गम तालुका आहे. तालुक्यात बीएसएनएल कंपनीचेे सर्वत्र मोबाईल टॉवर आहेत. मात्र गेले काही महिने या टॉवरची रेंज गायब होत असल्यामुळे ग्राहक नॉट रिचेबल होत आहेत. खेडे गावात फक्त बीएसएनएलचीच मोबाईल सेवा उपलब्ध असल्याने ग्रामस्थ संपर्कासाठी बीएसएनएल मोबाईल सेवेवरच अवलंबून असतात. मात्र गेले काही महिने हे टॉवर म्हणजे शोभेची बाहुली ठरले आहेत. बीएसएनएल कंपनीने ग्रामीण भागात मोबाईल टॉवर उभारल्यामुळे ग्रामीण ग्राहकांनी दूरसंचार कंपनीची सिम कार्ड घेतली आहेत. मात्र कंपनीच्या विस्कळीत सेवेमुळे अनेक ग्राहक खाजगी मोबाईल कंपन्याकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारने सर्व सरकारी कामकाज ऑनलाईन केले आहे. मात्र ऑनलाईन कामसाठी नेटवर्क मिळतं नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नेटवर्क नसल्यामुळे पाच मिनिटाच्या कामासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत राहावे लागत आहे. बी एस एन एल कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही. तर ग्राहक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
मोबाईल टॉवरर्सना दर्जेदार बॅटर्या नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास लगेचच मोबाईल नेटवर्क सेवा गायब होत आहे. सर्व टॉवर्सना चांगल्या प्रकारची बॅटरी बसविण्याची मागणी ग्राहाकांकडून करण्यात येत आहे.