

सध्या फोंडाघाट मध्ये पहाटे दाट धुके असते. या धुक्यामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे वाहन चालकांना दिसून येत नाहीत व यामुळे अनेक वेळा वाहनांचे अपघात होतात. अशा अपघातात आज पर्यंत अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत तर अनेक जनावरे जायबंदी झाली आहेत. वाहन चालक व प्रवासीही जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. अश्या अपघातांनंतर जनावरांचे मालक वाहन चालकांकडे नुकसान भरपाईची मागणी करत प्रसंगी भांडण, वादावादी करतात.
फोंडाघाट बाजारपेठेत मोकाट जनावरांबरोबर भटक्या कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या बाजारपेठ व परिसरातअश्या भटक्या कुत्र्यांच्या सात-आठ टोळ्या असून एका एका टोळीमध्ये वीस ते पंचवीस कुत्रे आहेत. या भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर विद्यार्थी, पादचारी यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे. काही वेळा या भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचे चावे घेतले आहेत.
मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांसहीत ग्रामस्थ, पादचारी, व्यापारी असे सर्वजण त्रस्त आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने या जनावरांच्या मालकांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.