

आडेली : श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे. प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितली आहे. मात्र त्यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावण सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर ‘शिवामूठ’ वाहण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. ‘शिवामूठ’ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. यावर्षी श्रावण मासात एकूण चार सोमवार आले आहेत. 28 जुलैपासून गावागावातील शिवमंदिरात, देवघरात महिलावर्ग ‘शिवामूठ’ व्रताचा आरंभ करणार आहेत.
श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाच्या वर्षी 28 जुलै 4 ऑगस्ट 11 ऑगस्ट व 18 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे. सोमवारी शिवमंदिरात अभिषेक एकादशणी लघुरुद्र महारुद्र श्री वरद शंकर पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम वैयक्तिक अथवा सार्वजनिक स्वरूपात केले जातात.
दर सोमवारी नवविवाहिता उपवास करून शिवाला शिवामूठ वाहतात. हे व्रत विवाहानंतर पाच वर्ष किंवा सोळा वर्षापर्यंत केले जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी धान्याची एक शिवामूठ शिवमंदिरात जाऊन महादेवास अर्पण करावयाची असते. यामध्ये पहिल्या सोमवारी तांदूळ दुसर्या सोमवारी तिळ, तिसर्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस व पाचव्या सोमवारी सातू शिवपिंडीवर वाहिले जातात. नवविवाहिता वधू-वरांचे आचार विचारांचे मतैक्य व्हावे व त्यातून संसारसुख लाभावे या उद्देशाने हे शिवव्रत आचरले जाते.
काहीही दान केल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणींना समाधान मिळते मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणार्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो.
28 जुलै रोजी तांदूळ, 4 ऑगस्ट रोजी तीळ, 11 ऑगस्ट रोजी मूग व 18 ऑगस्ट रोजी जवस या क्रमाने नवविवाहिता महादेवाची पूजा करून ‘शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा...’ असे म्हणत शिवपिंडीवर ‘शिवामूठ’ वाहणार आहेत.