Nitin Vengurlekar Death : मृत्यूनंतरही मानवतेची सेवा...

समाजसेवक नितीन वेंगुर्लेकर यांचे देहदान : एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
Nitin Vengurlekar Death
समाजसेवक नितीन वेंगुर्लेकर यांचे देहदान
Published on
Updated on

कुडाळ : सामाजिक क्षेत्रात गेली चार दशके नि:स्पृहपणे योगदान देणारे समाजसेवक नितीन वेंगुर्लेकर (६६) यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजसेवेचा वसा जपणाऱ्या वेंगुर्लेकर यांनी मृत्यूनंतरही आपली सामाजिक बांधिलकी कायम राखत 'देहदानाचा' प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांच्या पार्थिवावर एसएसपीएम रुग्णालयात वैद्यकीय प्रक्रियेनंतर देहदान पार पडले. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय संशोधनासाठी मोठे योगदान मिळाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

४० वर्षांची अखंड सेवा

श्री. वेंगुर्लेकर हे 'SCI - Service Civil International' मार्फत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. विशेषतः दादर येथील कमलाबाई मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये त्यांनी सलग ४० वर्षे गरजू विद्यार्थ्यांना मोलाची मदत केली. त्यांच्या निधनामुळे समाजकार्यातील एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. २८ एप्रिल रोजी उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वेंगुर्लेकर यांच्या स्मरणार्थ नुकतीच एक शोकसभा पार पडली. यावेळी 'जीवन आनंद संस्था - संविता आश्रम'चे अध्यक्ष संदीप परब, 'माझे आजोळ' संस्थेचे संस्थापक भरत भोकटे, किशोर भिसे, विनोद पवार, रवींद्र तरफे आदी मान्यवर उपस्थित होते. विजय तारी यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पश्चात पत्नी उषा वेंगुर्लेकर, मुलगी अश्विता आणि नातू आरव असा परिवार आहे.

देहदानातून दिला मानवतेचा संदेश

समाज केवळ जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही घडवता येतो, हे वेंगुर्लेकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांनी मृत्यूपूर्वीच देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा मान राखत एसएसपीएम रुग्णालयात देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. या महान निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news