

Vengurla bike car accident
वेंगुर्ला: वेंगुर्ला - सावंतवाडी - कुडाळ मुख्य मार्गावर मठ कुडाळतिठा येथे मंगळवारी (दि. २३) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मदन अच्युत मेस्त्री (वय ४२) यांचा मृत्यू झाला. मदन मेस्त्री यांचा भाऊ गुरुनाथ मेस्त्री यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात अपघाताची माहिती दिली. त्यानुसार, वेंगुर्ला पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.
मठ कुडाळतिठा येथील धोकादायक वळणावर हा अपघात घडला. वेंगुर्ल्यातून मठमार्गे डेगवे सावंतवाडी कडे जात असताना, नागेश पांडुरंग दळवी हे कुटुंबासमवेत ओमनी कार (MH 07 Q 4902) ने प्रवास करत होते. या वेळी, कुडाळहून वेंगुर्ला कडे येणाऱ्या मदन मेस्त्रीच्या (MH 07 AQ 2703) दुचाकीला कारने धडक दिली, ज्यामुळे मदन गंभीर जखमी झाले. अपघातात, त्याच्या मोटारसायकलीचा मेन स्टॅन्ड आणि रॉड त्याच्या पाठीत घुसला.
मठ येथील काही स्थानिकांनी त्वरित मदतीस धाव घेत, जखमी युवकाला बाहेर काढले आणि त्याला 108 एंब्युलन्सच्या सहाय्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पीएसआय योगेश राठोड, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, पी. एन. तांबे, जयेश शरमळकर आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पीएसआय योगेश राठोड यांनी पंचनामा केला. घटनेच्या ठिकाणी वेंगुर्ला व मठ परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, मठ माजी उपसरपंच निलेश नाईक, पालकरवाडी माजी सरपंच संदिप चिचकर, भूषण आंगचेकर, सुभाष बोवलेकर, प्रशांत बोवलेकर, अनिल तेंडोलकर यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार चालकासही जखमी झाल्यामुळे त्याला आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मृत मदन मेस्त्री हे वेंगुर्ला येथील परबवाडा माजी उपसरपंच प्रा. हेमंत गावडे यांच्याकडे भाड्याने राहत होते आणि सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे वेंगुर्ला आणि तेंडोली परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
मठ कुडाळतिठा येथील या गंभीर अपघातावर संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही, तर मठ, आडेली, वेतोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.