

Math High School gate damage
वेंगुर्ले : वेंगुर्ले- मठमार्गे सावंतवाडी रस्त्यावर भरधाव येणाऱ्या कारने मठ हायस्कूलसमोरील कमानीच्या संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री घडली. या अपघातात (क्रमांक MH-07-AS-9796) या कारचे मोठे नुकसान झाले असून, कमान आणि कठड्याचे एकूण सुमारे 72 हजार 700 रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच गस्तीदरम्यान घटनास्थळी पोहचलेल्या वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, हवालदार स्वप्नील तांबे आणि डीसोजा यांनी वाहनचालकाकडे अपघाताबाबत चौकशी केली. त्यावेळी चालक साईप्रसाद उर्फ गोट्या विजय नाईक (वय 32, रा. आडेली) याने पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ आणि धमकी दिल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी संशयित चालकाविरुद्ध वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय योगेश राठोड हे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.