देवगड, पुढारी वृत्तसेवा : तोंडावली येथील विनोद सुर्यकांत बोभाटे व त्यांचे मित्र दुर्ग संवर्धनाच्या कामात सक्रिय असून आपल्या गावातही पुरातन काही अवशेष सापडतात का? याचा ते शोध घेत होते. त्यांना आपल्या गावातील डोंगरावर काही वैशिष्ट्यपूर्ण पुरातन गोष्टी आढळल्या. पण त्याचा नेमका अर्थ त्यांना उलगडत नव्हता. गेल्याच आठवड्यात मुणगे येथे सापडलेल्या कातळचित्राची बातमी वाचून त्यांनी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांना केलेल्या फोन मुळे त्यांनी आपले सहकारी अजित टाककर यांच्या सोबत नुकतीच या भागाला भेट दिली. या चित्राचे महत्त्व ओळखून देवगड इतिहास संशोधन मंडळ व कोकण इतिहास परिषदेच्या वतीने ही मोहीम आयोजित करण्यात आली. Sindhudurg News
यावेळी कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि तोंडावली या दोन गावांच्या सीमेवर दोन वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे आढळून आली. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने २६ मार्चरोजी या कातळ चित्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी कोकण इतिहास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारीणीचे सदस्य रणजित हिर्लेकर यांनी या कातळचित्रांचे छायाचित्रण व त्याची आवश्यक ती मोजमापे घेतली आहेत. या कातळचित्रांचे रहस्य उलगडण्यासाठी आवश्यक तो अभ्यास सुरू करण्यात येत आहे. Sindhudurg News
रणजित हिर्लेकर पुढे म्हणाले की, हा एक सरासरी सहा ते सात मीटरचा चौरस आकाराचा कोरलेला पट आहे. याच्या मध्यभागी आग्नेय ते ईशान्य दिशेने एक रेष काढली. तर या पटाचे समान दोन भाग दिसून येतात. या रेषेच्या दोन्ही बाजूला सम अंगी चित्राप्रमाणे हे कातळ चित्र कोरलेले आहे. खेळाच्या पत्त्यांमधील राजाराणी यांची पत्ते डोळ्यासमोर आणा. या पत्त्यामधील हे चित्र पोटाच्या भागी जसे उलट सुलट जोडलेले असतात. तसे या कातळ चित्रात दोन मानवाकृती पोटाच्या भागांमध्ये एकत्र जोडलेले दिसतात. त्यामुळे या कातळ चित्राच्या दोन्ही मानवाकृतींच्या पोटाची एकत्रित जोडलेली मध्यभागी असणारी एक समान पट्टी दिसून येते.
त्यामुळे गावातील लोकांनी या चित्राला पांडव फळी असे नाव ठेवलेले असावे. या उलट सुलट मानवाकृतीच्या बाजूलाही काही डिझाईन कोरलेली दिसते. कोकणात आतापर्यंत सापडलेले चौरस पट पाहता हे चित्र विलक्षण वेगळ्या प्रकारचे आहे. तर दुसऱ्या कातळ चित्राचे काम अजून बाकी असून त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकेल. या शोध मोहिमेत रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या समवेत विनोद सूर्यकांत बोभाटे, अभिजीत नाना बोभाटे, सुरज संतोष बोभाटे या स्थानिकांनी सक्रिय सहभाग घेतला. विनोद बोभाटे यांनी आपल्या गावातील इतिहास उजेडात आणल्याबद्दल प्राचविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी बोभाटे यांचे विशेष कौतुक केले आहे.
तोंडवली गावाच्या सीमेवर हे वैशिष्ट्यपूर्ण कातळ चित्र सापडल्यामुळे कातळ चित्र अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. कणकवली तालुक्यात पहिल्यांदाच उजेडात आल्यामुळे या तालुक्यातही इतिहास संशोधन मंडळ व कोकण इतिहास परिषद संयुक्तपणे शोध मोहीम राबविणार आहे. त्यामुळे आता या परिसरात आणखी काही महत्त्वाचे प्राचीन अवशेष सापडण्याची इतिहासाला उजाळा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा