शिरगाव ; संतोष साळसकर शिरगांव, साळशी, चाफेड, कुवळे परिसरातील जंगलात गवा रेड्याच्या कळपांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येत आहे. शिरगाव – चौकेवाडी फाट्या नजीकच्या वळणावर एका मोठ्या गवा रेड्याने बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वारावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच हातापायांनाही दुखापत झाली आहे. ते कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना गुरुवारी २८ मार्च रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
काल गुरुवारी संध्याकाळी बाबल्या गणपत पवार हे कामानिमित्त मोटासायकलने शिरगावला गेले होते. ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी साळशीकडे आपल्या घराकडे जात होते. यावेळी चौकेवाडी फाट्या नाजिकच्या वळणावर अचानक गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या बाजूला हाता पायांनाही दुखापत झाल्याने त्यांना सत्यवान पवार या त्यांच्या नातेवाइकाने शिरगाव येथील खासगी दवाखान्यात त्यानंतर त्यांना शिरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. डोक्याला इजा झाल्याने सद्या ते कणकवली येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर परिमंडळ वनधिकारी सारीक फकीर, वनरक्षक रामदास घुगे यांनी पाहणी केली. सद्या साळशी, चाफेड, कुवळे, आयनल आदी गावातील जंगलात गवा रेद्यांचा मोठा कळप फिरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे, वायंगणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. काही भागात तर दिवसाढवळ्या हे गवा रेडे पाहायला मिळतात. रस्त्यावरही गव्यांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. रात्री वाहनचालकांना आपली वाहने चालवताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालवावी लागतात. सद्या काजू – आंबा हंगाम चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बागेत एकट्याने जाण्यास प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तरी संबंधित वनविभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांमधून होत आहे.
हेही वाचा :