

ओरोस : होळी निमित्त या वर्षी जिल्ह्यात 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1,136 ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. गावागावात होळी उत्सवाची तयारीला सुरुवात झाली असून सांगेली सारख्या काही मोठ्या होळी उत्सवासाठी गेले काही दिवस लगबग सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या संखेने चाकरमानी दाखल होतात.या वर्षी होळी 10 मार्च पासून सुरू होत आहे. काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो. या वर्षी जिल्ह्यात 538 ठिकाणी सार्वजनिक तर 598 ठिकाणी खाजगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीच पूजन केले जाणार आहे. काही गावात मानपानावरुन वाद होण्याची शक्यता असते, अश्या ठिकाणी प्रशासनाकडूप(निर्बंध) बंदी घातली जाते. तसेच ज्या गावात वाद आहेत अशा गावात वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न केले जातात. जेणेकरून हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न केले जातात यासाठी संबंधित मानकरी , ग्रामस्त यांच्या बैठका घेऊन समन्वय साधला जातो , यामध्ये शेवटपर्यंत तडजोड न झाल्यास अश्या ठिकाणी कार्यक्रमास निर्बंध घातले जातात . 10 मार्च पासून सुरू होणारा हा उत्सव चांगल्या उत्साही वातावरणात साजरा व्हावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक होळ्यामध्ये दोडामार्ग 52, बांदा 26, सावंतवाडी 40, वेंगुर्ला 27, निवती 12, कुडाळ 91, सिंधुदुर्गनगरी 9, मालवण 59, आचरा 21, कणकवली 67, देवगड 67, विजयदुर्ग 25, वैभववाडी 38, अश्या 538 ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणार आहे.