Thackeray Shiv Sena | सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेसाठी कसोटीचा काळ!

नेते, पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव; ‘आऊट गोईंग’ वाढले; संघटना बळकटीचे नेतृत्वासमोर आव्हान
Thackeray Shiv Sena  conflict
Thackeray Shiv sena(File Photo)
Published on
Updated on

कणकवली : साडेतीन वर्षापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेला शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दुभंगला आणि शिवसेनेत दोन पक्षांची निर्मिती झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ठाकरे शिवसेनेला फारसे यश न मिळाल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसला.

सिंधुदुर्गचा विचार करता सिंधुदुर्गात सध्या ठाकरे शिवसेनेसाठी कसोटीचा काळ आहे. गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजप आणि शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. नुकताच माजी आ. राजन तेली यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही आता सत्तेकडे आकर्षित होवू लागले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेसमोर कार्यकर्त्यांना टिकवण्याचे आणि पक्ष संघटना बळकटीचे आव्हान आहे.

Thackeray Shiv Sena  conflict
Kankavali News | कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाला तडा

एकेकाळी कोकण हा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र पक्ष फुटीनंतर ठाकरे शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही कोकणात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर गेल्या वर्षभरात ज्या पध्दतीने पक्ष नेतृत्वाने सिंधुदुर्गसह कोकणात संघटनेकडे लक्ष द्यायला हवे होते ते दिलेले नाही. नेते, पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव वेळोवेळी दिसून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व माजी खा. विनायक राऊत यांच्याकडे आहे. मात्र संघटना बळकटीसाठी त्यांच्याकडून व स्थानिक नेतृत्वाकडूनही फारसे प्रयत्न झालेले दिसले नाहीत. गेल्या वर्षभरात सत्तेतील भाजप आणि शिंदे शिवसेनेत मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आऊट गोईंगचे हे सत्र अद्याप थांबलेले नाही. अलिकडेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे माजी आ.राजन तेली यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केला तर वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्थात सत्तेत नसल्याने पक्षाला हा फटका बसत असला तरी पक्ष नेतृत्वाकडून मात्र डॅमेज कंट्रोलिंगसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

कुडाळ-मालवणचे माजी आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार जीजी उपरकर यांच्यासारख्या नेत्यांची फळी ठाकरे शिवसेनेकडे आहे, जनतेच्या अनेक प्रश्नांवर ही मंडळी शासन, प्रशासन पातळीवर विविध आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविताना दिसतात, परंतु पक्ष संघटना वाढी बाबतीत मात्र पदाधिकार्‍यांमध्येच मरगळ असल्याचे दिसत आहे. पक्ष नेतृत्वही याबाबत फारसे गंभीर नाही हेही वास्तव आहे.

Thackeray Shiv Sena  conflict
Kankavali News | कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाला तडा

पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेसमोर सत्ताधारी पक्षांचे मोठे आव्हान आहे. सत्ताधारी भाजप- शिंदे शिवसेनेकडे गावागावात कार्यकर्त्यांचे मजबुत नेटवर्क आहे. त्या तुलनेत ठाकरे शिवसेनेकडे तेवढे कार्यकर्त्यांचे बळ नाही. तसेच कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेला मानणारा काही प्रमाणात मतदार आहे, परंतु त्यावरच अवलंबून निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे वास्तव आहे. त्यासाठी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून नेते, पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक आहे. तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निभाव लागणार आहे. तुर्तास तरी ठाकरे शिवसेनेला पक्षात असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात टिकविण्याची कसरत करावी लागत आहे. आगामी काळ खर्‍या अर्थाने या पक्षासाठी परीक्षेचाच म्हणावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news