

कणकवली : कणकवली शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्टेट बँके समोरील पिलर क्रमांक 3 च्या ठिकाणी पिलरच्या जॉईंट असलेल्या उड्डाणपुलाच्या भागाला तडा गेला आहे. सर्व्हीस रोडच्या वरती हा तडा गेला आहे. तसेच साधारण तीन ते चार फुटाचा एक काँक्रीटचा तुकडा निघालेल्या स्थितीत आहे. हा तुकडा सर्विस रस्त्यावरून जाणार्या पादचारी किंवा वाहनांवर कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. गेले दोन दिवसापासून ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत असून याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या बॉक्सेल ब्रिजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यानंतर झालेले आंदोलन व घडलेल्या घटना यांनी कणकवलीतील फ्लाय ओव्हर व बॉक्सेल ब्रिज चर्चेत आले होते. याच बॉक्सेल ब्रिजचा एस.एम. हायस्कूल जवळ एक भाग खचल्याने तर दुसर्या बाजूचा काही भाग कोसळल्याने गेली तीन वर्ष या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी आजही बॅरिकेट लावलेली स्थिती आहे. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्राधिकरणकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आजही महामार्ग प्राधिकरणला हे पुल खचण्याची दुर्घटना घडणार नाही? याची शाश्वती नसल्याचे दिसून येते, अशी चर्चा जनतेमध्ये आहे.
कणकवलीतील उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक 3 हा स्टेट बँके समोर येत असून या पिलरवर फ्लाय ओव्हर ब्रिजचे वरील काँक्रीटचे दोन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्यापासून रस्त्याची ब्रिजवरची संरक्षण भिंत पर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णता भेग गेल्याचे दिसत आहे. त्या ठिकाणी काँक्रीटचा काही भाग कोसळू शकतोे. परंतु याबाबत महामार्ग प्राधिकरण किंवा जबाबदार प्रशासनाकडून या ठिकाणी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही.
कणकवलीतील उड्डाण पुलाला तडा गेलेल्या जागेची आपण शनिवार 14 जून रोजी पाहणी केली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येणार आहे. तज्ज्ञांच्या पाहणी नंतर याबाबत पुढील काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा या संदर्भात धोका आहे किंवा कसे हे स्पष्ट होणार आहे.
श्रीमती अनामिका जाधव, कार्य. अभियंता- महामार्ग प्राधिकरण विभाग- रत्नागिरी
कणकवली : उड्डाणपुलाला पिलरवर जोडणार्या भागाला गेलेला तडा.