

सावंतवाडी : सावंतवाडी-तळवडे बाजारपेठ येथील जय सोनू कुंभार यांचे जनरल स्टोअर्स' आणि इस्त्री सेंटर अशा दोन दुकानांना रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य, ग्राहकांचे कपडे आणि सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या दुकानाला आग लागली. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही ग्रामस्थांना दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाला निदर्शनास आल्या. त्यांनी तत्काळ याबाबत विजय कुंभार आणि आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली. कुंभार यांच्यासह शेजारी, व्यापारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दुकानालगत असलेल्या इतर दुकानांना आगीचा फटका बसला नाही. मात्र आगीत कुंभार यांच्या दुकानातील फर्निचर, पूजा साहित्य, मातीची भांडी आणि ग्राहकांनी इस्त्रीसाठी दिलेले कपडे भस्मसात झाले.
या दुर्घटनेतील सर्वात मोठा फटका कुंभार कुटुंबाला बसला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन माल खरेदीसाठी विजय कुंभार यांनी २ लाख रुपयांची रोकड दुकानात ठेवली होती. ती रोकड या आगीत जळून राख झाली.
मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर उघड्यावर पडलेल्या या कष्टकरी कुटुंबाला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी आता मोठ्या मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, स्थानिक व्यापारी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कुंभार कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि कुंभार कुटुंबीयांनी केले आहे.